

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात परवानगीशिवाय सुरू असलेल्या अतिथीगृहांवर तसेच दुसरे घर खरेदी करून ते पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या गैर-गोवेकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या व्यवसायासाठी संबंधितांनी सरकारच्या नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री खंवटे, राज्यात पर्यटन व्यवसाय करण्यासाठी सरकारने व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत पद्धतीने अतिथीगृह किंवा भाडेव्यवसाय चालविण्याची गरज नाही.
संबंधित व्यावसायिकांनी उपलब्ध असलेल्या सरकारी सुविधांचा लाभ घेऊन आपले व्यवसाय नियमित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात काही गैर-गोवेकरांकडून घरे किंवा मालमत्ता खरेदी करून ती पर्यटकांना भाड्याने देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
अशा मालमत्तांचा व्यावसायिक वापर करताना आवश्यक नोंदणी, परवाने आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य व्यवसाय आढळल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.
पर्यटन क्षेत्रातील व्यवसायांना प्रोत्साहन देतानाच गोव्यातील पर्यटन उद्योग अधिक शिस्तबद्ध आणि नियमनबद्ध करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. परवानगीशिवाय सुरू असलेल्या अतिथीगृहांमुळे अधिकृत पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होतो तसेच पर्यटकांच्या सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात, असेही ते म्हणाले.