

पणजी : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक कृषी उत्पादनांना स्वतंत्र आणि आकर्षक बाजारपेठेची ओळख मिळवून देण्यासाठी कृषी संचालनालयातर्फे ‘गोवा फ्रेश’ हा नवा ब्रँड २ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या जीएसएपी २०२५ तसेच ‘स्वयंपूर्ण गोवा-व्होकल फॉर लोकल’ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सनग्रेस गार्डन्स, फोंडा येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत ‘गोवा फ्रेश’ ब्रँडचे लोकार्पण होईल. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘गोवा फ्रेश’च्या माध्यमातून गोव्यात उत्पादित होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना एकसंघ आणि विशिष्ट ब्रँड ओळख देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गोव्याची कृषी परंपरा, स्थानिक उत्पादनांची अस्सुलता आणि आधुनिक बाजारपेठेच्या गरजा यांचा मेळ साधून या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या ब्रँडमुळे स्थानिक उत्पादनांची ओळख, बाजारपेठेतील दृश्यमानता, आकर्षकता आणि मूल्यवर्धन वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक शेतकरी, उत्पादक आणि उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
पॅकेजिंगच्या नव्या संकल्पनांचे प्रदर्शन:
‘गोवा फ्रेश’च्या ब्रँड लाँचसोबत पॅकेजिंग सोल्यूशन्स अँड प्रोटोटाइप शोकेस आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये गोव्याच्या स्थानिक उत्पादनांचे पॅकेजिंग आणि सादरीकरण अधिक आकर्षक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नमुने प्रदर्शित केले जातील. याशिवाय ‘गोवा फ्रेश’ लोगो व टॅगलाईन डिझाइन स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धांमधील निवडक सहभागी आणि विजेत्यांचा ब्रँड लाँच कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.