

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
कोलवाळ पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत उत्तर प्रदेशच्या इसमास अटक करून सुमारे १ लाख ३८ हजार रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त केला. ही कारवाई दि. ४ रोजी रात्री करण्यात आली.
कोलवाळ येथील हाऊसिंग बोर्ड कॉलिनीत अमलीपदार्थाची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शकाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर यांनी कॉन्स्टेबल सुदेश केरकर, आनंद राठोड, निखिल नाईक, सर्वेश कळंगुटकर, गौरेश शेट्ये या सहकाऱ्यासह त्या ठिकाणी सापळा रचला असता रात्री ८.१५ च्या दरम्यान सुनील रामशिरुमणी तिवारी (४८, रा. वाडेश्वरनगर, कुचेली, मूळ. उत्तर प्रदेश) हा त्या ठिकाणी येऊन संशयितरित्या घुटमळू लागला.
पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे १ लाख ३८ हजार रुपये किमतीचा १ किलो ३८० ग्रॅम वजनाचा गांजा हा अमलीपदार्थ सापडला. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल जप्त केला.
संशयित सुनील तिवारी याच्या विरोधात अमलीपदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय राणे पुढील तपास करीत आहेत.