

पणजी ः भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा काँग्रेसने नेहमीच अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मोदी यांनी आपल्या आचरणातून संविधानाचा वारंवार सन्मान केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी येथे बुधवारी भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित संविधान दिन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून संविधान दिन सोहळ्याचे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग, तामिळनाडूचे अध्यक्ष अण्णामलाई, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, भाजपने 370 कलम हटवून अखंड भारताची संकल्पना पूर्ण केली. त्याचबरोबर वंचितांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या.ककाँग्रेसचे नेते हातात संविधानाची प्रत घेऊन केवळ फिरत असतात. त्यामध्ये काय लिहिले आहे, ते वाचत नाहीत. काँग्रेसने सत्तेच्या काळात संविधानाची अंमलबजावणी केली नाही.
60 वर्षे सत्तेवर राहूनही संविधानाचा सन्मान किंवा संविधान दिन साजरा करणे काँग्रेसला शक्य झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशभर संविधान दिन सोहळा होत असल्याचे तरुण चुग म्हणाले. आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला. डॉ. आंबेडकर यांना अपमानित केले, त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यामुळे काँग्रेसला संविधानाबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.