

डिचोली ः राज्यातील पडीक शेती पुन्हा बहरावी आणि गोव्यात हरितक्रांती घडवून आणावी, यासाठी शेतकर्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून काम करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित ‘पीएम धनधान्य योजना’ आणि ‘राष्ट्रीय मसाला मिशन’ योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी संचालक किशोर भावे, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपस्थितांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट भाषण पाहिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. परंतु त्या योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी पडीक जमिनीवर पुन्हा शेती सुरू करणे आवश्यक आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात शेतीजमिनी वापरात नाहीत. फक्त पारंपरिक भातशेतीपुरते मर्यादित न राहता, भाजीपाला, मसाले, फळे,
फुले यांच्या लागवडीकडे वळावे, ही काळाची गरज आहे.‘गोवा सरकार दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपये कृषी क्षेत्रासाठी खर्च करते. लागवडीसाठी सवलती, आधारभूत किंमती आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु शेतकर्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही, ही खंत आहे. आज शेतात उतरलेली पिढी नवीन पिढीला शेतीचे ज्ञान व प्रशिक्षण देत नसेल, तर भविष्यातील पिढी शेतात उतरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.