

Pramod Sawant EDC Plots Review
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री गोवा आर्थिक विकास महामंडळ (ईडीसी) लिमिटेडच्या संचालक मंडळाची ४१० वी बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या व्यावसायिक कामकाजाचा तसेच पणजीतील पाटो प्लाझा परिसरातील ईडीसीच्या भूखंडांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी माहिती दिली की, संचालक मंडळाने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच प्रशिक्षण भागीदार आणि उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) गोवा केंद्राच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. याशिवाय गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आर्थिक कामगिरीचीही बैठकीत नोंद घेण्यात आली.
दरम्यान, ईडीसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले. गोव्यात उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, आर्थिक विकासाला गती देणे आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.