

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या १० अत्याधुनिक वाहने आणि ८ मोटारसायकलींना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे राज्यातील अग्निशमन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम व जलद झाली आहे.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, आग सुरक्षा व आपत्ती घटनांच्या बचावासाठी सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यासाठी लागणारी उपकरणे तसेच साधनसुविधा वेळोवेळी खात्याला देण्याचे काम केले आहे. या साधनसुविधांमुळे अग्निशमन स्थानक अधिक सक्षम होऊन जलदगतीने काम करू शकतील.
अनेकदा अरुंद रस्ते तसेच वाहतूक कोंडीमुळे आगीच्या घटनांपर्यंत अग्निशमन दलाची वाहने पोहोचू शकत नाही तिथे या दुचाकी पोहोचण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. या वाहनांच्या खरेदीसाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी आणि गोवा सरकारच्या निधीतून सुमारे २२.८० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
नव्या ताफ्यात ८ मिड-साईज पाण्याचे बंब वाहने, १ अत्याधुनिक हॅझमॅट प्रतिसाद वाहन, एक ४२ मीटर टर्न टेबल लॅडर वाहन आणि ८ मोटारसायकलींचा समावेश आहे. पाच नवीन पाण्याचे बंब वाहने काणकोण, कुडचडे, वास्को, पिळर्ण आणि पेडणे अग्निशमन केंद्रांवर, तर आणखी तीन पाण्याचे बंब वाहने मडगाव, फोंडा आणि वास्को येथे जुन्या वाहनांच्या जागी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक नितीन रायकर यांनी दिली.
याशिवाय, रासायनिक गळती, औद्योगिक दुर्घटना आणि धोकादायक पदार्थांशी संबंधित घटनांवर प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक हॅझमॅट प्रतिसाद वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच टोलेजंग इमारतींमधील आग आणि बचाव कार्यासाठी ४२ मीटर टर्न टेबल लॅडर अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि तपासणीसाठी ८ नवीन मोटारसायकली वास्को, डिचोली, वाळपई, कुंडई, कुडचडे, काणकोण, मडगाव तसेच खात्याच्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागाला देण्यात आल्या आहेत.