

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा परिसर व बाजारपेठेतील कचरा समस्या तसेच म्हापसा व्यापारी संघटनेचा प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी उत्तर गोवा भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. पेडणे व बार्देश तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गावातील तसेच म्हापशातील समस्या जाणून घेतल्या.
संबंधित अधिकारीवर्गाशी त्वरित फोनवरून संपर्क साधत नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी तंबी अधिकाऱ्यांना त्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण सायंकाळी उत्तर गोवा भाजपा कार्यालयात उपस्थित होतो.
नागरिकांनी विविध समस्या सांगितल्या त्यावर अधिकाऱ्यांना तोडगा काढण्यास सूचित केले आहे. माझे घर, रस्ता, ट्राफिक, शौचालय, बांधकामे आदी विविध विषय घेऊन नागरिक आले होते. संबंधित पोलिस निरीक्षक, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आदी अधिकाऱ्यांना या समस्या सोडविण्यास सांगितले आहे.
म्हापसावासीयांच्या रस्ता, कचरा, ट्राफिक या मुख्य समस्या होत्या. त्याबाबत मुख्याधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर या समस्या सोडवाव्यात, असा आदेश दिला आहे. म्हापशाचे आमदार सर्व प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात आहेत. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी काम करायला हवे
भाडे घेण्याविषयी मुख्याधिकाऱ्यांना आदेश
म्हापसा व्यापाऱ्यांचे ३ महिन्यांचे भाडे घेतले नव्हते ते लवकर घ्यावे, असा आदेश आपण मुख्याधिकाऱ्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर, प्रवक्ते रुपेश कामत, म्हापसा मंडळ अध्यक्ष रितेश मणेरीकर, माजी अध्यक्ष तन्वेष केणी, उत्तर गोवा भाजपा जिल्हा अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदी मान्यवर उपस्थित होते