

Civil defence mock drill to be held in Goa tomorrow
पणजी : पुढारी वृत्तसेवा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये उद्या ७ मे रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार गोव्यात ही मॉक ड्रिल पणजी (उत्तर गोवा), वास्को, दाबोळी - हार्बर (दक्षिण गोवा) येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली आहे. यासाठी नागरिकांना सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. यासाठी आज मंगळवारी विशेष बैठक होत आहे.
गृह आणि महसूल खात्याकडून या मॉक ड्रिलद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची प्रतिक्रिया, यंत्रणांची तत्परता आणि समन्वय तपासला जाणार आहे. ड्रिलदरम्यान अनावश्यक घबराट न करता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार वागावे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाच्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सजगता निर्माण करणे आणि संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयार ठेवणे हा आहे.
देशातील अनेक राज्यांमध्येही अशा प्रकारे टप्प्या-टप्प्याने मॉक ड्रिल होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक भूमीका घेतलेली आहे. तसेच दहशतवादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आकांनाही सोडणार नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. भारताने तिन्ही दलांनाही कारवाईची पूर्ण सूट दिली आहे. त्यामुळे संभाव्य भारत-पाकिस्तान युद्धाच्या पाश्वभूमीवर जनता आणि प्रशासन यांच्यात समन्वयासाठी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.