

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा विरोध अधिक तीव्र होत असून, मोठ्या संख्येने चिंबल ग्रामस्थ आज, गुरुवार १५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गोवा विधानसभेवर भव्य मोर्चा नेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.
मात्र, सरकारने कोणतेच ठोस आश्वासन न दिल्याने ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे चिंबलवासीय ठरल्याप्रमाणे विधानसभेवर मोर्चा नेणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत ग्रामस्थांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना सांगितले की, जिल्हा व सत्र न्यायालयाने युनिटी मॉल प्रकल्पाला दिलेल्या परवानग्या रद्द केल्या आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने त्या निर्णयाला आव्हान देऊ नये. मात्र, सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, युनिटी मॉल प्रकल्पामुळे गावाची ओळख, पर्यावरण, शेती, पाणीस्रोत तसेच स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन यासंबंधी गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.
त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या या भव्य आंदोलनामुळे विधानसभेच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
५०० हून अधिक पोलिस तैनात करणार...:
युनिटी मॉल प्रकल्प विरोधातील उद्याच्या नियोजित भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताची पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. सुमारे ५०० हून अधिक पोलिस तैनात केले जाणार आहेत. पणजीच्या बाजूने पूल सुरू होतो तेथेच हा मोर्चा अडवण्यात येण्याची शक्यता आहे. पोलिस स्थानक तसेच गोवा सशस्त्र दलाच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांना सकाळी ६ वाजताच उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.