

चिंबल पठारावरील युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्प इतरत्र हलवण्याचा सरकारचा निर्णय
सरकारकडून अद्याप कोणतीही लेखी माहिती मिळालेली नसल्याचा नागरिकांचा दावा
पर्यावरणविरोधी प्रकल्पांविरोधात ३० रोजी आझाद मैदानावर जाहीर सभा
पणजीत जमावबंदी आदेश लागू; पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्थेची तयारी
पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल पठारावर होऊ घातलेल्या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प चिंबल नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्हाला लिखित तसे काहीच कळलेले नाही.
हे प्रकल्प रद्द झाले तरीही पर्यावरणाला हानी पोचविणाऱ्या प्रकल्पांच्या विरोधात शुक्रवारी, ३० रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर व अजय खोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिरोडकर म्हणाले, चिंबल येथील प्रकल्प इतरत्र हलवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने आमच्याशी चर्चा केलेली नाही. पर्यावरणाची हानी करणारा प्रकल्प कुठेही आला तरी चिंबलचे नागरिक त्याला विरोध करतील. खोलकर म्हणाले की, तोयार तळ्याचे संरक्षण व्हावे, यासाठी आम्ही गेली ३३ दिवस उपोषण आणि आंदोलन केले. त्याचा आम्हाला लाभझालेला आहे. सरकारने प्रकल्प रद्द केल्याचे पत्र आम्हाला दिल्यानंतर लोकांशी चर्चा केली जाणार असल्याचे खोलकर म्हणाले.
जमावबंदी आदेश जारी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत पणजीमध्ये ३० रोजी कोणत्याही अनुचित घटना, शांततेचा भंग टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येणे आणि मिरवणुका काढणे किंवा आयोजित करणे; लाठी, तलवारी, खंजीर किंवा भाले यांसारखी शस्त्रे बाळगणे; लाऊड स्पीकरचा वापर करणे; घोषणाबाजी करणे; पणजी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आणि आसपास फटाके जाळण्यास उत्तर गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रतिबंध केला आहे. तशी नोटीस त्यांनी जारी केली आहे.