Majorda Flower Boats | माजोर्डा पॅरिशमधील परंपरा श्रद्धा, ऐक्याचे प्रतीक

Majorda Flower Boats | माँते सायबिणीच्या जत्रेचा धार्मिक भाग; जत्रेत बांबूच्या होड्यांना ताडाच्या पानांची सजावट, फुले वाहण्याची प्रथा
Majorda Flower Boats
Majorda Flower Boats
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्यातील माजोर्डा गावात साजरी होणारी आवर लेडी ऑफ माँते (माँते सायबिण) यांची जत्रा एका आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे गोव्यात ओळख निर्माण करून आहे. जत्रेच्या दिवशी ताडाच्या पानांनी सुबकपणे सजविलेल्या पारंपरिक होड्यांमध्ये विविध रंगांची फुले भरून ती माता मरियेला अर्पण करण्याची शतकाहून जुनी परंपरा आजही माजोर्डा पॅरिशमध्ये श्रद्धेने जपली जात आहे.

Majorda Flower Boats
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

गोव्यात केवळ माजोर्डा पॅरिशमध्येच आढळणारी ही परंपरा धार्मिक श्रद्धसह इतिहास, पर्यावरणपूरक जीवनशैली व समाज ऐक्याचे अनोखे प्रतीक ठरली आहे. माँते सायबिणीच्या जत्रेचा धार्मिक भाग इतर चर्चप्रमाणेच नवस, प्रार्थनांसह पार पडतो.

या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे माजोर्डा, कलाटा आणि डोंगरी या तीन वाड्यांतील ग्रामस्थांनी बांबूपासून तयार केलेल्या होड्या ताडाच्या हिरव्या पानांनी आकर्षकपणे सजवून त्यामध्ये बागा, शेत आणि परिसरातील विविध फुले भरून चर्चमध्ये आणली जातात. पवित्र मिस्साच्या प्रारंभी ही फुले माता मरियेला अर्पण केली जातात. त्यानंतर चर्चसमोर या होड्यांचे प्रदर्शन भरते आणि भाविक या अद्वितीय परंपरेचे दर्शन घेतात.

या परंपरेमागे एक हृदयस्पर्शी श्रद्धाकथा सांगितली जाते. पूर्वी माजोर्डातील अनेक पुरुष समुद्री प्रवास करणारे खलाशी होते. एका समुद्री प्रवासादरम्यान त्यांची होडी भीषण वादळात अडकली. मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी माता मरियेला प्रार्थना केली आणि सुखरूप वाचलो तर जत्रेच्या दिवशी फुले पारंपरिक टोपलीत नव्हे, तर होडीतून अर्पण करू, असा नवस केला.

श्रद्धेनुसार ते सर्वजण त्या वादळातून चमत्कारिकरीत्या वाचले. त्यानंतर त्यांनी बांबूपासून होडी तयार करून ती ताडाच्या पानांनी सजवली आणि फुलांनी भरून चर्चमध्ये आणली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.

पूर्वी जत्रेसाठी फुले 'बाजेटीओ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताडाच्या पानांच्या सुंदर टोपल्यांमध्ये आणण्याची प्रथा होती. प्रत्येक कुटुंब आपल्या बागेतील फुले या टोपल्यांमध्ये भरून चर्चमध्ये आणत. मात्र समुद्रातील त्या प्रसंगानंतर टोपल्याऐवजी होडीतून फुले अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती माजोर्डाची खास ओळख बनली, अशी माहिती लेजस फर्नांडिस यांनी दिली.

स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि परंपरेच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावलेले क्लेटो गुदिन्हो यांच्या माहितीनुसार, ही परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. आजही होडी सजविणारे काही ज्येष्ठ कारागीर ऐंशी वर्षांहून अधिक वयाचे असून त्यांनी ही कला आपल्या वडिलांकडून शिकली आहे. त्यामुळे ही परंपरा अनेक पिढ्यांपासून पुढे येत असल्याचे स्पष्ट होते.

रोजगारासाठी गोव्याबाहेर स्थलांतर, आर्थिक अडचणी आणि परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठांचे वाढते वय यामुळे ही प्रथा काही काळ बंद पडली होती. सुमारे ४० वर्षांपूर्वी 'ऑक्टिव्ह यूथ असोसिएशन'ने ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही कारणांमुळे तो थांबला. त्यानंतर सुमारे १४ वर्षांपूर्वी गावातील काही ज्येष्ठ आणि युवकांनी एकत्र येऊन ही परंपरा पुन्हा नव्या जोमाने सुरू केली. कोविड-१९ च्या दोन वर्षांचा अपवाद वगळता ती आजपर्यंत अखंड सुरू आहे.
या होड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सजावट आजही पूर्णपणे ताडाच्या पानांनीच केली जाते. पूर्वी सहज उपलब्ध असलेले हे नैसर्गिक साहित्य पर्यावरणपूरक असल्याने ग्रामस्थांनी आजही त्यात कोणताही बदल केलेला नाही. प्लास्टिक किंवा कृत्रिम सजावटीला फाटा देत पारंपरिक आणि निसर्गपूरक पद्धतीने होड्या सजवल्या जातात.

Majorda Flower Boats
Konkan Railway: रोहा–मडगाव रेल्वे मार्ग होणार अधिक सक्षम; १४५ टक्के क्षमतेचा ताण

पूर्वी स्पर्धा; आता सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप

पूर्वी माजोर्डा आणि कलाटा गावांमध्ये कोणाची होडी अधिक सुंदर याची मैत्रीपूर्ण स्पर्धा असायची. आता या स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. तिन्ही वाड्यांतील ग्रामस्थ परंपरा टिकवण्यासाठी एकत्र काम करतात. होडी तयार करणे, ताडाच्या पानांची सजावट करणे, फुले गोळा करणे आणि ती चर्चमध्ये नेणे या प्रत्येक कामात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलेही उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे ही परंपरा केवळ धार्मिक विधी न राहता संपूर्ण गावाला एकत्र आणणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव बनला आहे.

सांस्कृतिक वारशातील एक दुर्मीळ ठेवा

माजोर्डा, कलाटा आणि डोंगरी येथील ग्रामस्थांच्या मते, ही परंपरा पूर्वजांनी दिलेला अमूल्य वारसा आहे. नव्या पिढीनेही तो तितक्याच अभिमानाने जपण्याचा निर्धार केला आहे. श्रद्धा, इतिहास, पर्यावरण संवर्धन आणि समाज ऐक्याचा सुंदर संगम घडवणारी माँते सायबिणीच्या जत्रेतील फुलांच्या होड्यांची ही परंपरा आज गोव्याच्या सांस्कृतिक वारशातील एक दुर्मीळ आणि जपण्याजोगा ठेवा म्हणून ओळखली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news