

पणजी : पुढारी
भोम ते जुने गोवे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त ८,८६३ चौरस मीटर जमीन संपादित करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. भोम ते जुने गोवे या टप्प्यावर १३५.०५० किमी ते १४२.०५० किमी या पट्ट्यातील जमीन संपादनासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून, हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मोड (एचएएम) अंतर्गत राबविण्यात येणार आहे.
या अधिसूचनेनुसार, संबंधित जमीन मालक आणि इतर हितसंबंधित व्यक्तींना आक्षेप नोंदविण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आक्षेप लेखी स्वरूपात विशेष भूसंपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), पणजी येथे सादर करावे लागणार आहेत. प्राप्त आक्षेपांवर सुनावणी करताना संबंधित व्यक्तींना स्वतः उपस्थित राहण्याची किंवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून आक्षेप मंजूर किंवा फेटाळण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. भोम ते जुने गोवे हा मार्ग राज्यातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गापैकी एक असून, चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रवासाचा वेळ वाचण्यास आणि रस्ते सुरक्षेत सुधारणा होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.