

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशात पावसाळ्यातील आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्यांना त्याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत दिली.
आरोग्य मंत्री पटेल यांनी सांगितले की, मलेरियाचे निदान लवकर व्हावे यासाठी आणि त्यावरील संपूर्ण उपचारासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना औषधे आणि निदान करण्याची साधने पुरवली जातात, असे नमूद केले.
डेंग्यू आजारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मोफत निदानासाठी, देशभरात ८८७ सेंटिनेल सर्व्हिलन्स हॉस्पिटल्स आणि २७ एपेक्स रेफरल लॅबोरेटरीज यांचे जाळे उभारले आहे. केंद्र सरकार पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमार्फत सर्व संबंधित प्रयोगशाळांना एलजीएम चाचणीचे किट पुरवते.
लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, उपकरणे आणि आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देऊन निदानसंबंधी पाच प्रयोगशाळांचे जाळे बळकट केले आहे. तळागाळातील भागात पोहोच वाढवण्यासाठी क्षमता बांधणी, तसेच प्रशिक्षक, समुदाय नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
एकात्मिक रोगवाहक कीटक व्यवस्थापन, ज्यामध्ये निवडक उच्च-जोखीम असलेल्या भागात घरांमध्ये कीटकनाशकांची फवारणी, मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात मच्छरदाण्यांचा वापर, अळ्या खाणाऱ्या माशांचा वापर आणि शहरी भागात अळ्या-प्रतिबंधक उपाययोजना, जसे की जैव-कीटकनाशके, किरकोळ पर्यावरणविषयक उपाय आणि डासांची पैदास रोखण्यासाठी स्रोत नष्ट करणे यांचा समावेश आहे.
अतिसार प्रतिबंधक मोहीम राबवली जात असून त्याचा उद्देश पाच वर्षांखालील मुलांना अतिसारामुळे होणारे आजार कमी करणे आणि मृत्यू रोखणे हा आहे. माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच वर्तनातील बदलाबाबत संवाद यांवर लक्ष केंद्रित करणारे पूरक उपक्रम राबवणे; तसेच सोशल मीडिया, रेडिओ, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध व्यासपीठांद्वारे सार्वजनिक आरोग्यविषयक संदेशांचा प्रसार करणे.