

Goa Marathi Konkani Dispute
फोंडा : 'ज्यांना मराठी हवी त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावे’ अशी पोस्ट सोशल मीडियावर अपलोड करून दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी प्रकाश नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मराठीप्रेमी तथा गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधू गावडे-घोडकिरेकर यांनी याप्रकरणी म्हार्दोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या 31 मार्च रोजी प्रकाश नाईक यांनी पोस्ट फेसबूकवर टाकली होती. गोव्यात मागील काही दिवसांपासून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश नाईक यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे वाद उद्भवला आहे. पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
राज्यात मराठी भाषेला राजभाषेचेस्थान मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी मेळावे आणि बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या रविवारी मराठीप्रेमींचा एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठीला राजभाषेचे मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मराठीप्रेमी एकवटले असताना त्यात मध्येच खोडा घातलेल्या प्रकाश नाईक यांच्याविरूद्ध सध्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.