

पणजी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दूरध्वनीद्वारे केंद्रीय गृह खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात दिली. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई उपस्थित होते.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज आर्मी, नेव्ही, तटरक्षक दल, सीएसएफआय, गोवा पोलिस या सुरक्षा यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक घेऊन विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार, राज्यात व्हिसावर असलेल्या 3 पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत तत्काळ देश सोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत. तर दीर्घकाळ व्हिसावर असलेल्या 17 पाकिस्तानी नागरिकांवर पोलिस यंत्रणा लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राज्यात सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पर्यटन स्थळांसह मुख्य सार्वजनिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय दोन्ही विमानतळे, रेल्वे स्थानके, राज्यातील 6 जेटी, 28 धक्के या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व हॉटेल्स, गेस्ट हाऊस यांना पर्यटकांचे सी फॉर्म भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. शनिवारपासून राज्यात कोंबींग ऑपरेशन सुरू करण्यात येणार असून पर्यटन स्थळे तसेच गर्दी असलेल्या ठिकाणांवर पोलिस लक्ष ठेवतील आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करतील.
राज्यातील परराज्यातील लोकांची तपासणी केली जाणार असून राज्यातील काश्मीरी नागरिकांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातून राज्यात बाहेरून येणार्या पर्यटकांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. परराज्यांतून भाजीपाला, चिकन, मटन घेऊन येणार्या व्यापार्यांना आपले ओळखपत्र दाखवावे लागेल. याशिवाय आठवडी बाजाराच्या ठिकाणी येणार्या परप्रांतीयांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.