

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील आणखी एक रिसॉर्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सील करण्यात आले आहे. काणकोण काब द राम येथील द केप गोवा हे रिसॉर्ट अधिकाऱ्यांनी सील केले. अधिकाऱ्यांच्या तपासणीत गंभीर आग, विद्युत, संरचनात्मक आणि वैधानिक सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समितीने सांगितले की, हा परिसर गर्दनि भरलेला, अनिवार्य परवानग्यांशिवाय कार्यरत असलेला आणि मनुष्य व मालमत्तेसाठी धोका निर्माण करणारा आढळला.
एलपीजी सिलिंडरची असुरक्षित साठवणूक, अग्निशमन उपकरणांचा अभाव, बाहेर पडण्याचे मार्ग बंद असणे, धोकादायक विद्युत वार्यारंग आणि मंजूर मर्यादपलीकडे अनधिकृत बांधकाम ही नोंदवलेल्या प्रमुख उल्लंघनांपैकी काही आहेत.
पर्यटन विभागाने एका तात्पुरत्या खासगी झोपडीसाठी परवानगी दिली होती, त्या ठिकाणी आस्थापना मंजूर क्षेत्रापेक्षा खूप मोठ्या जागेत एक पूर्ण विकसित रेस्टॉरंट चालवत होती. यामध्ये बार काऊंटर, संलग्न स्वयंपाकघर, बेकरी, पॅन्ट्री, सुमारे १२० कर्मचाऱ्यांसाठी स्टाफ मेस, तळघरातील स्टाफ रूम, सुमारे १२० ग्राहकांसाठी बसण्याची सोय असलेली जवळपास ४० टेबल्स आणि हाऊसकीपिंग, विद्युत प्रणाली, साठवणूक, खाद्यपदार्थ आणि स्पा सेवांसाठी अतिरिक्त खोल्यांचा समावेश होता, जे पर्यटन विभागाने मंजूर केलेल्या क्षमता आणि क्षेत्रापेक्षा जास्त होते, असे आदेशात नमूद केले आहे. या आस्थापनेने किनारी नियमन क्षेत्र नियमांचेही उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. जोपर्यंत नियमांचे पूर्ण पालन केले जात नाही आणि सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत कामकाज बंद राहील, असेही आदेशात म्हटले आहे.