

म्हापसा : रमेश नाईक
कळंगुट हा जागतिक नकाशावर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या बराच लहरी आहे. मुक्तीनंतर प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाचे असले तरी वेगवेगळे उमेदवार निवडून आलेले दिसतात. पहिल्यांदाच आसेल फर्नाडिस काँग्रेस उमेदवारीवर सलग दोनदा निवडून आले.
विद्यमान आमदार मायकल लोबो यांनी या मतदारसंघात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारीवर हॅट्ट्रिक साधून त्यांचा विक्रम मोडला. २०२२ च्या निवडणुकीत आमदार लोबो यांना शह देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केला होता. राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांची एकजूट झाल्यास कळंगुटची निवडणूक अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
कळंगुट मतदारसंघात १९६३ च्या पहिल्या निवडणुकीत जॉन डिसोझा हे युनायटेड गोवन्स पार्टीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर १९६७च्या निवडणुकीत युनायटेड गोवन्स पार्टीचे एस. वेलेंटे विजयी झाले. १९७२ च्या निवडणुकीत जगदीश भुजंगराव हे युनायटेड गोवन्स पार्टीच्या तिकिटावर निवडून आले १९७७ च्या निवडणुकीत फर्नाडिस रुआल इलारिओ हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले.
१९८० मध्ये काँग्रेसचे डॉ. विल्फ्रेड डिसोझा विजयी झाले. १९८४ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे श्रीकांत केशव मळीक विजयी झाले. १९८९ मध्ये काँग्रेसचे सुरेश परुळेकर यांनी विजय मिळवला. १९९४ मध्ये तोमाझिन कार्दोझ यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.
१९९९ मध्ये सुरेश परुळेकर यांनी यूजीडीपी पक्षाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. २००२ मध्ये काँग्रेसचे आसेलो फर्नांडिस निवडून आले, तर २००७मध्ये पुन्हा काँग्रेसचे आसेलो फर्नांडिस यांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य मायकल लोबो यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. यावेळी त्यांना कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी साथ दिली होती, तरीही आसेल फर्नाडिस यांनी त्यांना कडवी झुंज दिली.
२०१७ मध्ये पुन्हा एकदा मायकल लोबो यांनी भाजपचे उमेदवार म्हणून कळंगुट मतदारसंघात विजय मिळवला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे जोसेफ सिक्वेरा यांना पराभूत केले. त्यानंतर मायकल लोबो आणि भाजपामध्ये पत्नीला उमेदवारी देण्यावरून वाद झाला. त्यानंतर त्यांनी 'टुगेदर फॉर बार्देश' या मथळ्याखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०२२ मध्ये मायकल लोबो हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी भाजपातर्फे जोसेफ सिक्वेरा यांनी निवडणूक लढवली होती.
मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यांतच मायकल लोबो यांनी आठ आमदारांसह "टुगेदर फॉर गोवा" या घोषवाक्याखाली पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपविरोधी मतदारांमध्ये मोठी निराशा पसरली. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात असलेला भाजपमधील नाराज गट कशाप्रकारे शांत करायचा, हे मायकल लोबो यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. मात्र सध्या तरी या मतदारसंघात त्यांना थेट टक्कर देईल असा प्रभावी चेहरा दिसत नाही. त्यांचे पूर्वीचे विरोधक जोसेफ सिक्वेरा सध्या भाजपमध्येच आहेत.
मात्र येणाऱ्या काळात ज्याला भाजपाचे तिकीट मिळणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. गेल्या वेळेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याने सिक्वेरा यांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. आतापर्यंत तरी मायकल लोबो यांच्या विरोधात कोणी ठोसपणे उभे राहताना दिसत नाही. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसे उमेदवार लोकांसमोर येताना दिसतील.
सध्या तरी भाजपमध्ये लोबो सोडल्यास दुसरा प्रभावी चेहरा नाही. गोवा पंचायत महिला शक्ती अभियानच्या उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष तसेच कळंगुटच्या पंच सदस्य गीता परब या भाजपच्या तिकिटासाठी दावेदार आहेत. हडफडे-नागवाचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनीही गेल्या वर्षापासून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे; मात्र बर्च प्रकरणानंतर आमदार लोबो यांच्यासोबत त्यांचे मतभेद निर्माण झाल्याने येत्या निवडणुकीत ते कोणता निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
कळंगुटचे माजी उपसरपंच सुदेश मयेकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांनी गेल्या वेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. तसेच कळंगुटचे पंच सदस्य प्रसाद शिरोडकर हे देखील निवडणुकीची तयारी करत असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसतर्फे माजी आमदार आनेलो फर्नांडिस, लॉरेन्स सिल्वेरा, विवेक डिसिल्वा आणि राजेंद्र कोरगावकर यांची नावे चर्चेत आहेत, तर आपचे उत्तर गोवा पदाधिकारी मॅन्युअल कार्दोज हे पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी येत्या निवडणुकीत मायकल लोबो यांना शह देण्यासाठी आनेलो फर्नांडिस, सुदेश मयेकर आणि रोशन रेडकर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ख्रिश्चन मतपेटी ठरते निर्णायक...
कळंगुट मतदारसंघात प्रामुख्याने ख्रिश्चन आणि हिंदू समाजातील मतांची विभागणी, तसेच उमेदवाराचा चेहरा यावर निवडणुकीची समीकरणे ठरत आली आहेत. या मतदारसंघात ख्रिश्चन मतदारसंख्या तुलनेने अधिक आहे. ही मते अनेक वेळा निर्णायक ठरलेली आहेत.