

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : थापा मारून असंख्य लोकांना गंडवणाऱ्या मनीष शशिकांत आंबेकर ( वय 47) या आंतरराज्य ब्लफमास्टर म्होरक्याला त्याच्या इतर चार जणांच्या गँगसह म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. शिवम मनीष आंबेकर (वय 24), रवी श्रीपती चव्हाण (वय 42), करण रवी चव्हाण (वय 20) व यश रवी चव्हाण (वय 20) अशी इतर अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आंबेकर याच्यावर महाराष्ट्र राज्यात नऊ गुन्हे नोंद आहेत.
याबाबत म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनोला, उकसई येथील रेश्मा ओगले या महिलेने म्हापसा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साधारण 4.35 च्या दरम्यान म्हापसा येथील मुथूट फायनान्स इमारतीच्या खाली सदर महिला उभी होती. यावेळी संशयित मनीष आंबेकर याने तिच्याशी संपर्क साधून आपण मुथूट फायनान्सचा कर्मचारी असल्याचे सांगून मुथूट फायनान्स मध्ये बराच काळ पडून असलेले तारण सोने आपण स्वस्तात देऊ शकतो, असे सांगितले. त्याच्या भूलथापांना बळी पडून रेश्मा उगले या महिलेने त्याला एक लाख रुपये देऊ केले.
सोने आणून देतो, असे सांगून त्यांनी तेथून पलायन केले. बराच काळ झाला तरी संशयित सोने घेऊन न आल्यामुळे तिने चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रुपये 59 हजार 500 रूपये, मोबाईल हँडसेट, (MH11 DD 2753) या क्रमांकाची चारचाकी जप्त केली. उत्तर व पोलीस अधीक्षक अक्षता कौशल, उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलीस पुढील तपास करीत आहेत.