

मिरज : गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरजमार्गे तस्करी करणार्या दोघांना मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी पहाटे अटक केली. जमीर अकबर मकानदार (वय 31, रा. पाडळी, जि. सातारा) व शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार (27 रा. बालाजीनगर विजयनगर, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून विदेशी दारू आणि ट्रक असा 68 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोव्यात निर्माण केल्या जाणार्या दारूची महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी नाही. तथापि गोव्यात निर्माण केलेल्या गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरजमार्गे सोलापूरकडे तस्करी होणार असल्याची माहिती मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक सुपे, जतचे प्रभारी निरीक्षक प्रभात सावंत, अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुटावळे, उदय पुजारी, इरफान शेख, स्वप्निल आटपाडकर, विनायक खांडेकर, पुंडलिक बिरुंगे आणि कविता सुपे यांचे पथक तयार करून मिरज-पंढरपूर मार्गावर सापळा लावण्यात आला होता.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक पंढरपूर रस्त्यावर आला असता, पथकाने छापा टाकून अडविला. यावेळी ट्रकमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समध्ये गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची दारू आढळून आली. पथकाने 33 लाख रुपये किमतीची 651 बॉक्स दारू आणि ट्रक असा 68 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिरजेत इतक्या मोठ्या प्रमाणात गोवा, मध्य प्रदेश बनावटीची दारू पकडण्यात आली आहे. ही दारू सोलापूरला नेली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कसून तपास केला जात आहे.