

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपच्या कदंबा प्लाटो येथे उभारण्यात आलेल्या नव्या राज्य मुख्यालयाचे उद्घाटन ६ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नव्या कार्यालयात पूजा व धार्मिक विधि पार पडले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कदंबा प्लाटो येथे हमरस्त्यालगत उभारण्यात आलेले हे भाजप भवन बेसमेंटसह चार मजल्यांचे असून, तळघर वगळता तीन मजली इमारत आहे. सुमारे २९०० चौ. मीटर जागेत उभारलेल्या या भव्य इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते.
इमारतीत मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र केबिन, मंत्र्यांसाठी दोन केबिन, तसेच प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस यांच्यासाठी स्वतंत्र केबिन आणि प्रतीक्षाह्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वरच्या मजल्यावर सुमारे ८०० व्यक्तींची आसन क्षमता असलेले सभागृह उभारण्यात आले आहे.
पक्षाच्या बैठका, मेळावे आणि अन्य कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. पणजी-जुने गोवे बगलमार्गालगत असलेले हे कार्यालय लक्षवेधी ठरत आहे. कार्यालयात भारतमातेचे चित्र तसेच कावी कलेत साकारलेले श्री लईराई देवीचे चित्र आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.
भाजपचे सुरुवातीचे कार्यालय १९९१ मध्ये पणजीतील समाधान इमारतीत सुरू झाले. त्यानंतर २००१ मध्ये पणजीतील आत्माराम बोरकर मार्गाजवळ नावेलकर आर्केड येथे पक्षाने स्वतःचे कार्यालय घेतले. सध्या पक्षाचे कामकाज तिथून सुरू आहे. आता कदंबा प्लाटो येथे राज्य भाजपचे स्वतंत्र व प्रशस्त मुख्यालय उभारण्यात आले आहे.