Nilesh Cabral | रखडलेल्या विकासकामांवरून काब्राल आक्रमक

Nilesh Cabral | कुडचडेत बसस्थानकासह अनेक प्रकल्प ठप्प; मुख्यमंत्र्यांकडे मांडणार कैफियत
Nilesh Cabral | रखडलेल्या विकासकामांवरून काब्राल आक्रमक
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

'मीही भाजपचाच आमदार आहे,' या शब्दांत कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रशासन आणि पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखविले आहे. शेजारील मतदारसंघांमध्ये विकासकामांना मिळणारी गती आणि कुडचडेतील प्रकल्पांची संथ वाटचाल यातील तफावत स्पष्टपणे मांडत त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर कैफियत मांडणार असल्याचेही काब्राल म्हणाले.

Nilesh Cabral | रखडलेल्या विकासकामांवरून काब्राल आक्रमक
Opposition to Casinos in Goa - गोव्यात कॅसिनोला वाढता विरोध

कुडचडेतील बसस्थानकाच्या कदंब दुरवस्थेबाबत बोलताना काब्राल यांनी रखडलेल्या विकासकामांवर परखड भाष्य केले. केवळ बसस्थानक नव्हे, तर नऊ ते दहा वर्षांपूर्वी सुरू झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प आजही अपूर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प सर्व तातडीने पूर्ण होणे आवश्यक असून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुडचडे नगरपालिकेची नवी प्रशासकीय इमारत वगळता कदंब बसस्थानक, क्रीडा संकुल, रवींद्र भवनाचे विस्तारीकरण, अग्निशामक दलाच्या इमारतीचे विस्तारीकरण, बाबा बोरकर वाचनालयाचा विकास अशा अनेक प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत. काही ठिकाणी कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडल्याने प्रकल्पांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प कागदावरच राहिले असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. कुडचडे शहरातील कदंब बसस्थानक हे शेकडो प्रवाशांच्या दैनंदिन वापराचे प्रमुख केंद्र आहे.

मडगाव, फोंडा, पणजी, सांगे, केपे तसेच कुळे आणि मोले भागात जाणाऱ्या प्रवाशांना याच स्थानकावरून बससेवा मिळते. मात्र गेली चार दशके तात्पुरत्या शेडमध्ये सुरू असलेल्या या बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, बसण्यासाठी बाक नाहीत, स्वच्छतेचा अभाव आहे आणि पावसाळ्यात छत गळत असल्याने प्रवाशांना छत्र्या उघडून उभे राहावे लागते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

काब्राल म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जागेचा भराव टाकून ती सपाट करून दिली होती. त्यानंतर जवळपास नऊ वर्षे उलटली, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रकल्पासाठी वास्तुविशारद राहुल देशपांडे यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली होती. मात्र कामाला गती मिळत नसल्याने त्यांनी या प्रकल्पातून माघार घेतली. सध्या गोवा विकास साधन सुविधा मंडळाने नव्या सल्लागाराची नियुक्ती केली असून प्रकल्पाचा आढावा घेतला जात आहे.

Nilesh Cabral | रखडलेल्या विकासकामांवरून काब्राल आक्रमक
Goa Politics-संकेत आर्सेकरांच्या एण्ट्रीने बदलणार समीकरणे

मात्र एवढा कालावधी उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे काब्राल यांनी नमूद केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प गेल्या आठ ते दहा वर्षांत पुढे सरकलेले नाहीत. पन्नास वर्षांचा इतिहास असलेल्या बाबा बोरकर वाचनालयाच्या विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. अनिशामक दलाच्या इमारतीचे विस्तारीकरणही रखडले आहे.

अनेक प्रकल्प लालफितीत अडकून पडल्याचे चित्र दिसत असून त्यामागील कारणे स्पष्ट नसल्याची खंत काब्राल यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा देताना मतदारसंघातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी मी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली होती. मीदेखील भाजपाचाच आमदार आहे. राज्यातील इतर भाजप आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामे ज्या वेगाने पूर्ण होत आहेत, त्याच गतीने कुडचडेतील प्रकल्पही पूर्ण व्हायला हवेत, असे ते म्हणाले.

रखडलेले प्रकल्प...

कुडचडे मतदारसंघात कदंब बसस्थानक, क्रीडा संकुल, रवींद्र भवन विस्तार, अग्निशामक इमारत आणि बाबा बोरकर वाचनालय अशा अनेक प्रकल्पांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. काही प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडले आहे, तर काही ठिकाणी प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news