

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष यांच्यात युतीबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पहिली चर्चा झाली असून, येत्या निवडणुकीत भाजप आणि मगो युती करून लढणार आहेत. ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मगोचे अध्यक्ष माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी सोमवारी आल्तिन्हो येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षांमधील युतीबाबत चर्चा झाली.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजप आणि मगोने एकजुटीने कसे काम करायचे, यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. येत्या
भाजपसोबत युती करण्याबाबत सर्वप्रथम मगोच्या आमसभेत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेत्यांसोबत मगोचे नेते चर्चा करतील. या प्रक्रियेनंतरच आगामी निवडणुकीसाठी युती पुन्हा अस्तित्वात येईल, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी केलेली चर्चा प्राथमिक स्वरूपाची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांत सविस्तर चर्चा होईल. काही मुद्द्यांवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मगोच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे.
दोन्ही पक्ष युती करून निवडणूक लढवतील आणि २०२७ मध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही आगामी निवडणूक भाजपसोबत एकत्रितपणे लढवणार असल्याचे सांगितले. काही मतदारसंघात मगोची मोठ्या प्रमाणावर मते आहेत. राजकीय पक्ष म्हणून त्या मतदारसंघात काम करणे स्वाभाविक आहे.
याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा झाली असून, ती सकारात्मक झाली आहे, असे ते म्हणाले. निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्याने आगामी काळात सविस्तर चर्चा होईल. मगो किती जागा लढवणार, हे पुढील चर्चेनंतरच निश्चित होईल, असेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.