

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीत एप्रिल ते जून या कालावधीत मोठी घट नोंद झाली आहे. दाबोळी विमानतळावरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत तब्बल ६९ टक्क्यांची घट, तर मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४२ टक्क्यांची घट झाली आहे.
देशातील विमानतळांवर नोंदवलेल्या मोठ्या घसरणींमध्ये गोव्याचा समावेश झाला आहे.
राष्ट्रीय पातळीवर याच कालावधीत भारतातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीत सुमारे १० टक्क्यांची घट झाली. यामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत २७ टक्क्यांची घट झाली, तर परदेशी विमान कंपन्यांनी मात्र सुमारे ६ टक्के अधिक प्रवासी वाहून नेले.
गोव्यातील दोन्ही विमानतळांवरील घसरण राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक असल्याने राज्याच्या आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः दाबोळी विमानतळावरील ६९ टक्के घट ही अत्यंत मोठी मानली जात आहे.
पर्यटन व्यवसायावर परिणामाची शक्यता
गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महत्त्वाची असल्याने या घसरणीचा पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परदेशी पर्यटकांच्या आगमनासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा महत्त्वाची असते. त्यामुळे विमान कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा, उड्डाणांची वारंवारता आणि प्रवासी मागणी याबाबत घेतले जाणारे निर्णय गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी निर्णायक ठरू शकतात.