

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोलीतील नव्या बसस्थानकाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील महिन्यात पूर्ण केले जाईल. गणेश चतुर्थीपूर्वी हे बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.
डॉ. शेट्ये यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बसस्थानकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विविध सुविधांबाबत अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली.
डॉ. शेट्ये म्हणाले की, काही तांत्रिक कारणांमुळे कामाला विलंब झाला असला तरी कामाची प्रक्रिया अखंडपणे सुरू होती. आपण स्वतः सातत्याने भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहोत.
सुसज्ज बसस्थानक उभे राहणार...
आमदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तसेच कंत्राटदाराशी संबंधित काही बाबीही समोर आल्या. मात्र काम कधीही पूर्णपणे बंद पडले नाही आणि सातत्याने सुरू राहिले. आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून डिचोलीकरांना सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे बसस्थानक लवकरच उपलब्ध होणार आहे.