

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोली नगरपालिकेची निवडणूक येत्या मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त असून सध्या पालिका क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकूण १४ प्रभाग निश्चित मानले जात असून विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आरक्षणाचा मुद्दा ठरणार कळीचा महिला, सर्वसाधारण, ओचीसी व इतर आरक्षणाबाबत सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग आरक्षणावर अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
काही नगरसेवकांना प्रभाग बदलण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात काही जणांनी पर्यायी प्रभागात 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे. नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी १४ ही प्रभागांत विकासकामांना गती देण्यासाठी पालिका मंडळाने प्रयत्न केल्याचे सांगितले. काही कामे पूर्ण झाली असून काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
मुख्यमंत्री, नगरनियोजन मंत्री, स्थानिक आमदार व इतर मंत्र्यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार निधीतूनही काही प्रकल्प राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या प्रभागांत टाईल्स, सुशोभीकरण, गटारांवर लाह्या घालणे आदी कामांना वेग देण्यात येत आहे. अटीतटीची लढत अपेक्षित आगामी निवडणूक विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.
स्थानिक आमदार, भारतीय जनता पक्ष तसेच इतर पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. प्रत्येक प्रभागात अनेक उमेदवार उभे राहण्याची शक्यता असल्याने मतदारांचे प्रत्येक मत निर्णायक ठरेल. बहुतेक विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून काही नवोदितही वेगळी रणनीती आखून कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे.
आरक्षणाचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत. डिचोली शहरात नियोजनबद्ध विकासाची गरज असून त्यासाठी निश्चित मास्टर प्लान तयार करून प्रभाग व रचना करणे व कामाचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिक्रिया नगरवासीय व्यक्त करताना दिसतात कायमस्वरूपी तसेच जनतेच्या उपयोग ठरणारे प्रकल्प राबवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर गोवाच्या संकल्पनेनुसार शहरात फारशी उपलब्धता झालेली नाही, अशा प्रतिक्रिया ही व्यक्त होत. कचरा व्यवस्थापनात पालिका अग्रेसर असली तरी आजही अनेक लोक कचऱ्याच्या संदर्भात बेजबाबदारपणे वागत असून आमचे ज्येष्ठ तरुण व सेवाभावी सफाई दूत नियमित साफसफाईत गुंतलेले असूनही कचरा फेकू ना एक टक्काही फरक पडलेला नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
त्या संदर्भात ठोस उपाययोजना गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करताना दिसतात. प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेऊन नगराध्यक्ष कार्य असले तरी जनतेची हवी तशी साथ मिळालेली नाही, असे चित्र दिसून येते. डिचोली बाजार परिसरात अनेक सुविधांचा अभाव असून गटारीला या आणि तसेच तुटलेल्या आहेत तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण दिसतात त्याबाबतही आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी खंत नगरवासीय व बाजारातील लोक व्यक्त करताना दिसतात.
शहरात अनेक समस्या; तोडगा काढा
मलनिस्सारण प्रकल्प, योग्य पार्किंग व्यवस्था, सफाई अभियान गटार योजनेचे सुयोग्य नियोजन, बाजार परिसरातील व्यवस्थापन एकूणच पुढील ५० वर्षांचा विचार करून शहर विकासाचा आराखडा सुयोग्य पद्धतीने तयार करण्याबाबत निश्चित धोरण आखणे गरजेचे असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. डिचोलीत सौरउर्जा बाबत जागृती आहे. मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवले जात आहे. तरीही त्रास कमी झालेला नाही. भटकी कुत्री डोकेदुखी ठरत आहेत. समस्यांना तोडगा काढण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा
सोमवारी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पालिकेची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. सरकारी तसेच इतर थकबाकी वसुली, उत्पन्न खर्च ताळमेळ राखणे, बाजार व्यवस्थापन, सोपा कर आकारणीतील बदल, प्रलंबित विकासकामे अशा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.