

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
डिचोलीतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला सध्या गती मिळाली आहे. आगामी २ महिन्यांत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून पावसापूर्वी बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती गोवा साधन सुविधा मंडळाचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी दिली.
आमदार मायकल लोबो यांनी स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, साधन सुविधा मंडळाचे अधिकारी रोहित कदम, श्रीपाद कवळेकर वाहतूक अधिकारी संदीप पारोडकर, समीर चोडणकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, पद्माकर मळीक, वल्लभ साळकर तसेच नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर दीपा पळ, दीपा शिरगावकर अनिकेत चणेकर, गुंजन कोरगावकर नगरसेवक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डिचोली बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बस स्थानकासोबतच अनेक वर्षांपासून रखडलेल्या अग्निशमन दलाच्या इमारतीची तसेच सुमारे ७० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सरकारी संकुलाच्या कामाचीही पाहणी करून आढावा घेतला.
बस स्थानकाचे काम सातत्याने रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात मुख्यमंत्री तसेच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले असले, तरी आता त्याला चांगली गती मिळाली असून दर्जेदार कामासह नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.
बस स्थानकाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण परिसर सुसज्ज करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी काही महिने लागतील. मात्र, पावसापूर्वी बस स्थानक प्रवाशांसाठी पूर्णतः सुसज्ज करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वस स्थानकासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च असून पहिल्या मजल्यावर वाहतूक खात्याचे सुसज्ज कार्यालय असेल दसऱ्या मजल्यावर कदंबाचे कार्यालय तसेच खाली दुकाने गाळे असतील व इतर सर्व प्रवासी सुविधा असतील.
लोकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले. डिचोली अग्निशमन दलाची इमारत अनेक वर्षांपासून रखडलेली असून आतापर्यंत तीनवेळा कंत्राटदार बदलल्यामुळे कामावर परिणाम झाला. मात्र, आता या कामालाही गती देण्यात आली असून साधन सुविधा मंडळाच्या पथकाला लक्ष घालून आगामी काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे लोबो यांनी सांगितले.
शवागृहासाठी 15 लाखांचा खर्च अपेक्षित
डिचोली रुग्णालयाच्या मागील बाजूस शवागृह उभारण्याची योजना असून त्यासंदर्भातही मायकल लोबो व आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. या शवागृहासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, नगरसेवक दीपा, दीपा शिरगावकर तसेच अन्य नगरसेवक व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारी संकुलाचे कामे जोरात : शेट्ये
डिचोली येथे सुमारे ७० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सरकारी संकुलाचे काम वेगाने सुरू असून या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. या संकुलात सर्व सरकारी कार्यालये एकाच छताखाली असतील तसेच भव्य कला भवन, सुसज्ज पार्किंग व्यवस्था तसेच अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कंत्राटदारामार्फत काम जलदगतीने सुरू असून हा प्रकल्प ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.
राज्यात गोवा साधन सुविधा मंडळामार्फत सध्या सुमारे ७० विविध प्रकल्प सुरू आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व उपयुक्त प्रकल्प राबवणे हा आहे.
- मायकल लोबो, अध्यक्ष, गोवा साधन सुविधा मंडळ