

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
विधानसभा निवडणुकीला अवघे सहा महिने राहिल्याने राज्यातील इतर मतदारसंघांसोबत डिचोली मतदारसंघामध्येही इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढलेली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले डॉ. चंद्रकांत शेट्ये (९६०८ मते) व त्यांना कडवी टक्कर दिलेले मगो पक्षाचे उमेदवार माजी आमदार नरेश सावळ (९२९० मते) यांच्यातच पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. शेट्ये हे निवडून आल्यापासूनच भाजपशी संलग्न राहिले आहेत. त्यांचे बंधू व अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. येणारी निवडणूक आपण भाजपतर्फे लढवणार असे ते वारंवार सांगत असून भाजपच्या अनेक कार्यक्रमांना ते उपस्थित राहात असतात. त्यामुळे भाजपतर्फे डॉ. शेट्ये हेच उमेदवार असतील हे नक्की झाले आहे. मात्र, सावळ यांचा पक्ष अद्यापही गुलदस्त्यात असून ते पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविणार की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे पाहावे लागेल.
डिचोली मतदारसंघातून भाजपचा झेंडा पहिल्यांदा २००२ मध्ये फडकवणारे व त्यानंतर २००७ व २०१७ मध्ये जिंकलेले व त्यानंतर सभापती पद भूषवलेले राजेश पाटणेकर यांना भाजपने २०२२ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना ५१४१ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय नाहीत. ही बाब आमदार डॉ. शेट्ये यांच्यासाठी लाभदायी आहे.
दुसरीकडे २००७ मध्ये काँग्रेसच्या व २०१७ व २०२२ मध्ये मगो पक्षाच्या चिन्हावर लढलेले. मात्र, २०१२ मध्ये अपक्ष म्हणून जिंकलेले नरेश सावळ हे दोन वेळा मगोच्या उमेदवारीवर पराभूत झाल्याने ते यावेळी पुन्हा मगोची उमेदवारी घेतील की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी मगो नेतृत्वार टीका करत पक्ष सोडला होता. त्यामुळे ते यावेळी कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतात की २०१२ प्रमाणे अपक्ष लढतात हे पाहावे लागेल.
गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस युती झाली व या युतीत डिचोली गोवा फॉरवर्डला मिळाला तर ते गोवा फॉरवर्डचे उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे. काहीही झाले तरी येत्या निवडणुकीत विद्यमान आमदार डॉ. शेट्ये व माजी आमदार नरेश सावळ यांच्यातच लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
या दोन नेत्यांव्यतीरिक्त इतरही अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये काँग्रेसतर्फे महेश म्हांब्रे व मनोज नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे सनी मानकर यांची नावे चर्चेत आहेत. सनी मानकर यांनी या मतदारसंघात जोरदार काम सुरू केले आहे. युवक, महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी लक्ष वेधले आहे. या कामांचे मतांत किती रूपांतर होते हे आता बघावे लागेल. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही त्यांना भक्कम साथ दिली आहे.
नरेश सावळ यांनी आमदार असताना अनेक कामे केलेली आहेत. सध्यही ते लोकांच्या संपर्कात आहेत. मात्र, ते उमेदवारी कुठल्या पक्षाची घेतात यावर त्यांचा विजय अवलंबून असल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी मगो पक्ष नेतृत्वार टीका करून पक्ष सोडला होता. त्यामुळे त्यांना मगोपची उमेदवारी मिळले की नाही ही शंका आहे. काँग्रेस पक्षातर्फे अद्याप तरी येथे प्रबळ असा उमेदवार दिसत नाही.
एक पालिका व पाच पंचायतींचा समावेश
डिचोली विधानसभा मतदारसंघात डिचोली पालिकेसह मुळगाव, साळ, लाटंबार्से, मेणकुरे व अडवलपाल या पाच पंचायतींचा समावेश आहे. बहुतांश पंचायती व पालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.
एकमेव जिल्हा पंचायत भाजपकडे
डिचोली मतदारसंघात पालिकेसह पाच पंचायती असून पालिका वगळून पाच पंचायतींसाठी असलेल्या लाटंबार्से या जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. पद्माकर मळीक हे डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत जिंकले होते. भाजप व अपक्ष आमदार डॉ. शेट्ये यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.