

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी ते फोंडा राष्ट्रीय महामार्गावरील भोम येथे उड्डाणपूल बांधण्याबाबत नितीन गडकरी यांनी मार्च महिन्यामध्ये वर्कऑर्डर दिल्याचे सांगितले आहे. एका सरपंचाच्या सांगण्यावरून या प्रकल्पाला मान्यता दिली होती, असे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे सांगत आहेत.
आता तेच गावडे या प्रकल्पाला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी विरोध करून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भोम नागरिक समितीचे प्रमुख संजय नाईक यांनी केला. पणजी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, येथील देवस्थाने वाचवण्यासाठी येथे रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाणपूल नको, तसेच महामार्ग गावातून नेण्यापेक्षा बगल मार्ग काढावा ही आमची मागणी आहे.
मात्र गेली साडेतीन वर्षे लोकांना सहकार्य न करणारे गावडे आता निवणुकीसाठी सहकार्य करण्याची भाषा करत असल्याचा दावा नाईक यांनी केला. केंद्र व राज्य सरकार लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. रस्ता रुंदीकरण करणे किंवा उड्डाणपूल बांधणे यावरच विचार होत आहे. तो रद्द व्हावा व बगल मार्ग काढावा अशी मागणी नाईक यांनी केली.
आपण भोम येथील रस्ता रुंदीकरण व उड्डाणपूल बांधण्याच्या विरोधात आहे. आपण लोकांसोबत राहणार आहे, असे प्रियोळचे आमदार गोविंद गावडे म्हणाले होते. मात्र, मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. या दुटप्पी भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.