

जेटी उभारण्याबाबत कल्पना नसल्याचा स्थानिकांचा दावा
'एनर्जी वीक' कार्यक्रमासाठी जेटी उभारल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मुसळधार पावसामुळे बेतूल येथील जेटीचा काही भाग समुद्रात कोसळल्यानंतर या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. समुद्रात पडून राहिलेला जेटीचा अवशेष स्थानिक मच्छीमारांसाठी मोठा धोका निर्माण करत असून, मच्छीमारी हंगाम सुरू असतानाच हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. समुद्रात कोसळलेला जेटीचा भाग तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी कुडचडेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी केली आहे.
मंगळवारी आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी बेतूल पंचायतीच्या पंच सदस्यांसह घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या जेटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांसोबतही या विषयावर पाहणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले की, संबंधित जेटी उभारण्याबाबत स्थानिकांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. त्यावळी सुरू असलेल्या 'एनर्जी वीक' कार्यक्रमासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वापरासाठी ही तात्पूर्ती जेटी उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता जेटीचा काही भाग समुद्रात कोसळल्याने त्याचा फटका थेट स्थानिक मच्छीमारांना बसत आहे.
सध्या पारंपरिक मच्छीमारीचा हंगाम सुरू झाला असून अनेक होड्या दररोज समुद्रात जात आहेत. अशा परिस्थितीत समुद्रात पडून राहिलेला लोखंडी व काँक्रीटचा अवशेष नौकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत आहे. भरती-ओहोटीच्या वेळी हा भाग पाण्याखाली जात असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मच्छीमार समाजाच्या पाठीशी उभा : आमदार डिकॉस्ता
स्थानिक आमदार या नात्याने आपण मच्छीमार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे एल्टन डिकॉस्ता यांनी स्पष्ट केले. समुद्रात कोसळलेला जेटीचा भाग तातडीने हटवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मच्छीमारांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जीवितहानीची भीती
स्थानिक मच्छीमारांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समुद्रात पडलेला जेटीचा भाग हटवावा, अशी मागणी केली आहे; अन्यथा मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याबरोबरच जीवितहानीची शक्यताही नाकारता येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
बांधकाम, खर्चाचा तपशील जाहीर करावा
जेटीच्या बांधकामाची आवश्यकता, त्यासाठी झालेला खर्च, तांत्रिक निकष आणि देखभालीची जबाबदारी याबाबतही परिसरात चर्चा सुरू झाली असून, संबंधित विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मच्छीमारी हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन समुद्रातील अडथळा दूर करावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.