

पणजी : प्रभाकर धुरी
'बनारस' चित्रपटाने मला कलाकार आणि माणूस म्हणून दोन्ही प्रकारे बदलून टाकले, असे अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जीसह शहाना गोस्वामी, नीरज काबी, छाया कदम, इंदिरा तिवारी आणि अँटनीथासन जेसुथासन यांच्यासह इतर कलाकार आहेत.
पत्रकार परिषदेत बॅनर्जी यांनी महाकुंभ मेळ्यात थेट चित्रीकरण करण्यातील आव्हाने आणि उत्स्फूर्तता याबद्दल सांगितले. नियंत्रित स्टुडिओ सेटवर काम करण्यापेक्षा हे वेगळे होते. मोठ्या गर्दीत अभिनय करताना बरीच अनिश्चितता असते.
त्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील विश्वास विशेषतः महत्त्वाचा ठरतो, असे ते म्हणाले. या अनुभवाने नुक्कड नाटक सादर करण्याच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून दिली, असे सांगून बॅनर्जी यांनी या चित्रीकरणाचे वर्णन "स्ट्रीट सिनेमा" असे केले.
चित्रपट निर्माते भरत बाला हे संगीताचे जादूगार ए. आर. रहमान यांच्यासोबत 'बनारस' या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागात या चित्रपटाचा इंडिया प्रीमियर होत आहे. वडील आणि मुलीमधील नातं, संगीताचा वारसा आणि पिढ्यांमधील अतूट बंध यावर आधारित हा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना ए. आर. रहमान म्हणाले की, हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन्ही भारतीय शास्त्रीय संगीताने त्यांच्या संपूर्ण सर्जनशील प्रवासात त्यांना सतत प्रेरणा दिली आहे. राग आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावना त्यांच्या संगीत अभिव्यक्तीला आजही आकार देत राहतात.
चित्रपटाच्या संगीत रचनेतील आपल्या दृष्टिकोनाबद्दल सविस्तर सांगताना रहमान यांनी रागांचा आपल्या रचनांमध्ये समावेश करण्याबद्दल सांगितले. भारताच्या सांस्कृतिक विविधतेवर विचार करताना ते म्हणाले की, ती त्यांच्या संगीताच्या शोधाला सतत प्रेरणा देत राहते. "मला प्रत्येक संस्कृती आवडते," असे ते म्हणाले. पंजाबी भाषेची ताकद ते बंगाली भाषेचा गोडवा, प्रत्येक भाषेची स्वतःची वेगळी शैली असते, असे त्यांनी नमूद केले.
भाषा आणि त्यांचे सांस्कृतिक सार आपल्या संगीतात एकमेकांत मिसळू देण्याची सवय असल्याचेही त्यांनी सांगितले. 'बनारस'साठी त्यांनी देव गांधारसारख्या कमी वापरल्या जाणाऱ्या रागांकडे वळले आहे. भरत बाला यांनी 'मर्यान'नंतर बऱ्याच काळाने फिचर फिल्म दिग्दर्शनाकडे परतण्याबद्दल सांगितले.
मधल्या काळात त्यांनी अनेक लघुपटांवर काम केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्यासाठी फिचर फिल्म बनवणं ही सर्जनशील प्रक्रियेचीच सातत्यता आहे, जी एखादी कथा सांगावीशी वाटली की हाती घेतली जाते. बनारस शहर पडद्यावर अनेक प्रकारे दाखवलं गेलं असलं, तरीही ते शहर शोधण्यासाठी अजूनही खूप काही देतं, असे बाला म्हणाले.
छायाचित्रण दिग्दर्शक मार्क कोनिक्स यांनी सांगितले की, प्रकाश, कॅमेरा अँगल, फ्रेमिंग आणि कंपोझिशन यांच्या माध्यमातून कलाकारांच्या चेहऱ्यावरील "भावना टिपणं" हेच त्यांचं मुख्य लक्ष होतं. प्रेक्षकांनी बाहेरून निरीक्षण करणारे राहण्याऐवजी चित्रपटाचा भाग असल्यासारखं वाटावं, हा त्यांचा उद्देश होता.
अभिनेते नीरज काबी यांनी आपण साकारलेल्या व्यक्तिरेखांचा आपल्यावर कायम राहणारा प्रभाव याबद्दल सांगितले. त्या व्यक्तिरेखा अनेकदा आपल्या खऱ्या आयुष्यात झिरपतात आणि आपला भाग बनतात, असे ते म्हणाले. 'बनारस'मधील त्यांची व्यक्तिरेखा डिमेंशियाने ग्रस्त आहे. ही भूमिका साकारल्याने आपलं स्वतःचं बालपण आठवलं, ज्या अवस्थेत भविष्य अस्तित्वात नसतं आणि वर्तमानही नसतं, असे ते म्हणाले.