

पणजी : भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यानंतर चाणक्य म्हणून समजले जाणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हे येत्या काही दिवसांमध्ये गोव्यामध्ये येणार आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघे चार ते पाच महिने बाकी असल्यामुळे संतोष यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार असून या दौऱ्यात ते गोवा विधानसभा निवडणुकीचे नियोजन करण्याची शक्यता आहे.
गोवा भाजपने २०२७ मध्ये ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेले असले तरी पक्षाला स्वबळावर बहुमत मिळावे यासाठी संतोष हे नेते व कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे बुधवारी नवी दिल्लीमध्ये जाऊन संतोष यांची भेट घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बी. एल. संतोष लवकरच गोव्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही गुरुवारी संतोष यांची भेट घेतली आहे.
वरिष्ठ नेत्यांचे गोव्याकडे लक्ष
गोवा राज्य पुन्हा एकदा भाजपकडेच राहावे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे. ही भावना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बी. एल. संतोष गोवा दौऱ्यावर येणार असून येत्या काळात ते गोव्यात बस्तान मांडून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार-पाच महिन्यांमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते गोव्यामध्ये दाखल होणार आहेत.