

गोवा : शक्तिपीठ महामार्गावर असलेल्या सर्व औषधी वनस्पतींचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न आहे, सोबतच त्याच वनस्पती अन्य भागात मोठ्या प्रमाणात लावल्या जातील, अशी माहिती केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. कुठलाही प्रकल्प उभा राहत असताना त्याला काही लोकांचा विरोध होत असतो. समृद्धी महामार्गालाही अशा पद्धतीने विरोध झाला होता. मात्र आज समृद्धी महामार्गामुळे त्या परिसरात झालेली भरभराट आपण पाहत आहोत, असेही ते म्हणाले.
मंगळवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा येथे १० व्या आयुर्वेद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला प्रतापराव जाधव गोव्यात दाखल झाले. यावेळी ते बोलत होते. प्रतापराव जाधव म्हणाले की, २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व पहिल्यांदा आयुष मंत्रालय तयार झाले. पुढे २०१७ मध्ये आयुर्वेद दिन कार्यक्रमात २४ देश यात सहभागी झाले. त्यानंतर १५० पेक्षा अधिक देश या कार्यक्रमात सहभागी झाले. यापूर्वी आपण आयुर्वेद दिवस धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा करत होतो. मात्र त्याची विशिष्ट तारीख असावी, अशी मागणी होती या पार्श्वभूमीवर आमच्या मंत्रालयाने २३ सप्टेंबरला हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर होत असलेला हा पहिलाच आयुर्वेद दिनाचा कार्यक्रम आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मंगळवारी होत असलेल्या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित असणार आहेत. "आयुर्वेद फॉर पिपल अँड प्लॅनेट" ही कार्यक्रमाची थीम आहे.
शक्तिपीठ महामार्गावर असलेल्या सर्व औषधी वनस्पतींचे पुनर्रोपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, सोबतच त्याच वनस्पती अन्य भागात मोठ्या प्रमाणात लावल्या जातील. अन्य भागात असलेल्याही उपयुक्त औषधी वनस्पतींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, आमच्या विभागांतर्गत एक संस्था त्यावर काम करत आहे. कुठलाही मोठा प्रकल्प उभा राहतो तेव्हा त्याला काही लोकांचा विरोध होत असतो. समृद्धी महामार्गालाही अशा पद्धतीने विरोध झाला होता. मात्र आज समृद्धी महामार्गामुळे त्या परिसरात झालेली भरभराट आपण पाहत आहोत. माझ्या लोकसभा मतदारसंघातूनही समृद्धी महामार्ग ८७ किलोमीटर जातो, असेही त्यांनी सांगितले.