

मडगाव : पर्यटनाच्या माध्यमातून नकाशावर जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या गोव्यात सध्या टॅक्सी व्यावसायिकांमध्ये संघर्षाचे वादळ घोंगावत आहे. पाळोळे येथे घडलेला हल्ल्याचा प्रकार हा केवळ एका चालकावरचा हल्ला नसून, तो गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या विश्वासार्हतेवरच झालेला आघात मानला आत आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील टॅक्सी चालकांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, वर्मा उपस्थित नसल्याने उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
गोव्यातील पर्यटन क्षेत्रात पुन्हा हादरे बसू लागले आहेत. अहमदाबाद येथील पर्यटक महिलेला दमदाटी केल्याच्या घटना ताजी असतानाच पाळोळे येथे गोवा माईल्सच्या एका चालकाला स्थानिक टॅक्सीचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पर्यटकांना सेवा देणार्या चालकांवर अशा प्रकारची दादागिरी केली जात असल्याने त्यामुळे राज्याची प्रतिमा संपूर्ण देशात मलीन होत असून प्रशासनासमोर यावर तोडगा काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
गोव्यात टॅक्सी व्यवसायात स्थानिक चालक आणि गोवा माईल्स या अॅप-आधारित टॅक्सी सेवेतील चालकांमध्ये सुरू असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पाळोळे येथे गोवा माईल्सच्या एका चालकावर स्थानिक टॅक्सी चालकांनी हल्ला केल्याची घटना घडली. गेल्या सात दिवसांत बाणावली, वार्का, कळंगुट, बागा आणि पाळोळे येथे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. गोवा माईल्सच्या चालकांना स्थानिकांनी धमकावले आणि मारहाण केल्याचेही प्रकार समोर आले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी टॅक्सी चालकांनी थेट पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या कार्यालयावर धडक दिली.