

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
सुकूर येथे १८ जून रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आनंद पाटील यांचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी (दि. २८) मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित सौरभ नारुलकर हा घटनेनंतर फरार होता. रविवारी त्याने पर्वरी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पूर्ववैमनस्यातून १८ जून रोजी रात्री सुकूर येथील पंचायत कार्यालयाजवळ ही घटना घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, सुकूर येथील सौरभनारुलकर याने चिंबल येथील त्याचे मित्र प्रणव बोरकर, अर्जुन पर्येकर आणि अनिश बोरकर यांच्या मदतीने आनंद पाटील यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दांड्याने बेदम मारहाण केली होती.
या हल्ल्यात आनंद गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी प्रणव बोरकर, अर्जुन पर्येकर आणि अनिश बोरकर या तिघांना अटक केली होती. मुख्य संशयित सौरभ नारुलकर हा फरार होता. रविवारी त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. सोमवारी (दि. २९) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी यापूर्वी भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१(३), १०९(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आनंदच्या मृत्यूनंतर कलम १०३(१) (खून) समाविष्ट केले आहे. निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.