

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यातील अर्पोरा येथील एका रेस्टॉरंट-कम-क्लबमध्ये शनिवारी (दि.६) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची घटना समोर येताच आग्निशामक दलाच्या पथकांनी घटनास्थळी पाचारण केले. घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी रविवारी (दि.७) पहाटे घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.
गोव्यातील अर्पोरा येथील एका एका रेस्टॉरंट-कम-क्लबमध्ये शनिवारी (दि.७) रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर काहीजण जखमी आहेत. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकांसह पोलिसांची पथके व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर पोलिसांसह बचाव पथकाने तातडीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. रविवारी पहाटे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, अरपोरा येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागून २३ जणांचा मृत्यू झाला, ही गोव्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गोव्याच्या इतिहासात पर्यटनाच्या दृष्टीने अशा प्रकारची घटना घडणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्री सावंत यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींना अटक करणार असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले.