

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
आरोबा-तुये मार्गावरील सुमारे चार दशकांपूर्वीचा अरुंद पूल लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. या जुन्या पुलाच्या जागी नवीन, रुंद आणि सुसज्ज पूल उभारण्यासाठी आवश्यक अतिरिक्त जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात सुरू झाली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
आरोबा-तुये मार्गावरील हा पूल सध्या अत्यंत अरुंद बनला असून, अलीकडेच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढती वाहतूक, पुलाची अपुरी रुंदी आणि संरचनेची सदास्थिती लक्षात घेता येथे तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार आरोलकर यांनी यापूर्वी विधानसभेतही आवाज उठवला होता. विद्यमान पुलाच्या जागी आधुनिक वाहतुकीच्या गरजांनुसार रुंद आणि सुरक्षित पूल उभारण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. प्रस्तावित पुलासाठी सध्याच्या जागेबरोबरच अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्यामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
त्यासाठी प्राथमिक कारवाई सुरू करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुलाची रुंदी कमी असल्यामुळे दोन चारचाकी वाहने एकाच वेळी सुरक्षितपणे एकमेकांना ओलांडू शकत नाहीत. अनेकदा एका बाजूच्या वाहनचालकाला पुलापूर्वी थांबून समोरून येणारे वाहन पुढे गेल्यानंतरच मार्गक्रमण करावे लागते.
रात्रीच्या वेळी तसेच गर्दीच्या कालावधीत ही परिस्थिती अधिक धोकादायक बनते. पुलाच्या बाजूचा भाग खचल्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीतीही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्य सरकारकडून विकासकामांना पूर्ण सहकार्य मिळत असल्याने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे, असे आमदार आरोलकर म्हणाले.
विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने टीका करावी; लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, कोणत्याही टीकेमुळे मांद्रे मतदारसंघातील विकासकामे थांबणार नाहीत. नागरिकांना सुरक्षित रस्ते, पूल आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
आरोबा-तुये येथे नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा आरोलकर यांनी केला. आवश्यक जमीन संपादन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुन्या व अरुंद पुलाच्या जागी नवीन, रुंद, आधुनिक आणि सुरक्षित पूल उभारला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.