

पणजी: पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात 'साऊथ ग्रुप' लीकर लॉबीकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या दलालीतील सुमारे 45 कोटी रुपये आम आदमी पार्टीने गोवा विधानसभा निवडणुकीत खर्च केल्याचा दावा ईडीने सादर केलेल्या आरोप पत्रात केला आहे. त्यामुळे आता आपचे गोव्यातील विद्यमान दोन आमदार व विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले तत्कालीन 37 उमेदवार बिथरले आहेत. त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. त्यामुळे चौकशी सुरू झाल्यास काय करावे, या विवंचनेत ते आहेत. Goa News
दरम्यान, सुडाने पेटलेले भाजपवाले काहीही करू शकतात पण आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले. आप हा एखादा गावठी पक्ष नाही. राष्ट्रीय पक्षात त्याची गणना होते. एका नियमावलीनुसार, पक्षाचा कारभार आहे. निवडणुकीचा खर्च करण्यासाठी खास पथक दिल्लीहून आले होते. कुठल्याच उमेदवाराकडे पार्टी फंड देण्यात आला नव्हता. तत्कालीन उमेदवारांनी जो खर्च केला, त्याचा हिशेब लगेच निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता, असे पालेकर म्हणाले. हिशेब सादर केला नसता तर सुडाने पेटलेल्या सरकारने आतापर्यंत कोणालाच सोडले नसते, असे ते म्हणाले. Goa News
बाणावली मतदारसंघातून आमदार वेन्जी व्हिएगस आणि वेळ्ळी मतदारसंघातून क्रूज सिल्वा विजयी झाले होते. सांताक्रूज मतदारसंघातून अमित पालेकर, शिरोड्यामधून महादेव नाईक व मये येथून राजेश कळंगूटकर यांनी जोरदार टक्कर दिली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 45 कोटी रुपये हवाला आणि अन्य माध्यमांतून गोव्यात आणण्यात आले होते, असा गंभीर आरोप अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने केला आहे. ईडीने या प्रकरणी विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात हा उल्लेख आहे. यात चॅरियट प्रॉडक्शन मीडिया प्रा. लि. आणि कंपनीचा मालक राजेश जोशी यांना आरोपी बनविण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने या आरोपपत्राची दाखल घेतली आहे.
या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या प्रकरणी कोणाची सुटका नाही, असा संदेश पसरला आहे. गोवा कनेक्शन उघड झाल्यामुळे राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा