Goa News : इंधनावरील व्हॅट वाढवल्याने विमान प्रवास महागणार | पुढारी

Goa News : इंधनावरील व्हॅट वाढवल्याने विमान प्रवास महागणार

प्रभाकर धुरी

पणजी : मोप आणि दाबोली विमानतळावरील विमानांची संख्या आणि विमानसेवेवरून गेले काही दिवस चर्चा आणि टीका रंगू लागली आहे. त्यापाठोपाठ आता विमान सेवेबाबत नवीन माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) किमतीवरील व्हॅट कर पूर्वीच्या ८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेला आहे. हा नवीन कर दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून विमानसेवा महागणार आहे. Goa News

जेट इंधनावरील व्हॅट करात वाढ झाल्याने विमान कंपनीच्या खर्चात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढेल आणि देशांतर्गत आणि परदेशी विमान प्रवासाची तिकिटे महाग होणार आहेत. खरे तर आता राज्यातील दोन विमानतळांवरून देश परदेशातील फ्लाइट कनेक्टिव्हिटी सुधारत होती. शिवाय उन्हाळ्यात प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता होती. अशातच ही दरवाढ करण्यात आली आहे. Goa News

दरम्यान, २०२३ मध्ये तेल विपणन कंपन्यांनी जेट इंधनाच्या किंमती अनेक वेळा कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनावरील कर वाढविण्याचे पाऊल राज्य सरकारचे उचलले आहे. गेल्या महिन्यातच केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी नवीनतम किंमतीत कपात केली होती.
राज्यांद्वारे आकारल्या जाणाऱ्या इंधन करानुसार देशभरात एअरलाइन्सचे दर बदलतात. त्यात जेट इंधनाची किंमत सर्वाधिक आहे. दिल्ली मध्ये व्हॅट २६ टक्के आहे, तर शेजारच्या महाराष्ट्रात १९ टक्के आहे.  मात्र,  विमान उद्योगाला चालना देण्यासाठी विमान इंधन स्वस्त करण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने राज्यांना सांगितल्यानंतर गोवा सरकारने २०२३ मध्ये विमान इंधनावरील कर कमी केला होता.

जानेवारी २०२३ मध्ये राज्याने इंधनावरील कर १८ टक्के वरून ८ टक्के पर्यंत कमी केला होता;पण १ एप्रिल पासून तोच कर आता ८ टक्क्यांवरून १५ टक्के होणार आहे.हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांना कर कमी केल्याने केवळ ३ महिने दिलासा मिळाला होता.आता १ एप्रिलपासून पुन्हा विमान प्रवासाचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

Back to top button