AAP Mhargai Mukti Yatra Goa|महागाईविरोधात आपची 'म्हारगाय मुक्ती यात्रा'

महागाईविरोधात आपची 'म्हारगाय मुक्ती यात्रा'
AAP Mhargai Mukti Yatra Goa
चावडी-काणकोण: जाहीर सभेत बोलताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी. सोबत वाल्मिकी नाईक, आमदार कुझ सिल्वा व इतर. (छाया : संजय कोमरपंत)
Published on: 
Updated on: 

काणकोण : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष राजेश गावकर आणि बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांच्या उपस्थितीत श्री मल्लिकार्जुन मंदिर, काणकोण येथून आम आदमी पार्टीच्या 'म्हारगाय मुक्ती यात्रे'चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि काणकोणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'लोकांचो एकवोट' या कार्यक्रमात नागरिकांनी वाढत्या महागाईमुळे भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडली. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांनी आपापली अवाढव्य वीजबिले जाळून महागाईचा निषेध केला.

दरम्यान, आतिशी यांनी भाजपवर राजकीय घोडेबाजाराचा खर्च सामान्य गोमंतकीयांच्या खिशातून वसूल केल्याचा आरोप केला. "भाजप आमदार खरेदी करण्यासाठी सामान्य गोमंतकीयांच्या खिशातून पैसे काढत आहे," असा आरोप करत गेल्या दहा वर्षांत भाजपने २१ आमदार विकत घेतल्याचा दावा त्यांनी केला.

AAP Mhargai Mukti Yatra Goa
Goa High Court | गोवा सरकारला उच्च न्यायालयाचा दणका! प्रतिज्ञापत्रासाठी नऊ महिने विलंब, अधिकाऱ्याला दंड

काणकोणमधील नागरिकांना संबोधित करताना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीच्या हमी योजनांद्वारे वाढत्या महागाईवर ठोस उपाय दिला जाणार आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दरमहा १५ हजार रुपयांचा लाभ मिळेल. मोफत वीज, महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि मोफत बस प्रवास अशा सुविधांद्वारे हा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या महागाईचा आर्थिक भार कमी करण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतील, असेही त्या म्हणाल्या.

AAP Mhargai Mukti Yatra Goa
One Goa Project Construction Stay| 'वन गोवा' प्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती

यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, वीज, इंधन, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य गोमंतकीय कुटुंबांवरील आर्थिक भार दिवसेंदिवस वाढत आहे. दूध, किराणा सामान, पेट्रोल, वीज, आरोग्यसेवा आणि शिक्षणाचा खर्च वाढल्याने सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन कठीण झाले असून, कुटुंबांना मूलभूत गरजा भागवतानाही संघर्ष करावा लागत आहे. वाल्मिकी नाईक यांनीही भाजप सरकारच्या गृह आधार योजनेवर टीका केली.

एकीकडे सरकार गृह आधार योजनेअंतर्गत १,५०० रुपये देऊन जनतेला दिलासा देत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे घरगुती खर्चात प्रचंड वाढ होऊ देत आहे. वाढलेली वीजबिले, पेट्रोलचे दर, शिक्षण, आरोग्यसेवा, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यांच्या तुलनेत सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत अपुरी आहे, असे ते म्हणाले. ही यात्रा महागाईचा सामान्य जनतेवर होणारा वास्तविक परिणाम समोर आणेल आणि प्रत्येक मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहोचवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष राजेश गावकर यांनी सांगितले की, महागाईच्या वाढत्या ओझ्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना प्रचंड मेहनत करूनही घर चालवणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य गोमंतकीयांमध्ये वाढत असलेली आर्थिक ओढाताण ही गंभीर सामाजिक समस्या असून, आम आदमी पार्टी या मोहिमेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे.

बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी वाढत्या महागाईचा परिणाम लहान व्यावसायिक आणि स्थानिक रोजगारावर होत असल्याकडे लक्ष वेधले. वाढत्या खर्चामुळे फुलविक्रेत्यांसारख्या छोट्या व्यावसायिकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले. ही यात्रा थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१९ डिसेंबरपर्यंत यात्रेचे नियोजन

'म्हारगाय मुक्ती यात्रे' च्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते स्थानिक नागरिकांसह १९ डिसेंबरपर्यंत संपूर्ण गोव्यात प्रवास करणार आहेत. या काळात वाढत्या महागाईविरोधातील लढा जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन भाजप सरकारला जाब विचारावा आणि महागाईमुक्त व भ्रष्टाचारमुक्त गोव्याच्या निर्मितीसाठी एकत्र यावे, असे आवाहन आम आदमी पार्टीतर्फे गोमंतकीयांना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.