पणजी, पुढारी वृत्तसेवा : मागील चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीण भागासोबतच शहरी भागांमध्येदेखील मोठ्या झाडांची पडछड सुरु आहे. रविवारी (दि. 21) पणजी महानगरपालिका उद्यानानजीक असलेले भलेमोठे झाड तरुणीच्या अंगावर कोसळले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आरती गौंड (वय. 19 रा. बेती) असे मृत तरुणीचे नाव आहे. गोमेकॉत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अग्निशमन दलाचे जवान एस. एम. पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही घटना सकाळी 11 वाजता घडली. बेतीमध्ये राहणारी आरती ही कामासाठी पणजीमध्ये आली होती. तिच्या अंगावर मोठे झाड पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी युवतीला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून तिला गोमेकॉत दाखल केले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, काही दिवसांपासून पणजी शहरातील धोकादायक झाडे हटविण्यासंदर्भात दै. पुढारी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यानेच अशा घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.