गोवा : जोरदार पावसाने कुशावती नदिला पूर | पुढारी

गोवा : जोरदार पावसाने कुशावती नदिला पूर

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्यात जोरदार पावसाने कुशावती नदिला पूर आला आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. केपेच्या कुशावती नदीने रुद्रावतार धारण केला असून रविवारी रात्री पारोडा पुल पुराच्या पाण्यात बुडू लागला आहे.पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास पारोडा गाव पुराच्या पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी रात्री आठच्या दरम्यान पुराचे पाणी पुलावरून वाहू लागले. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कुशावती नदीला पूर आलेला आहे. गेले तीन दिवस पुराचे पाणी पुलाला लागून वहात होते.

पण रविवारी रात्री आठच्या दरम्यान नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले.रात्रीच्या अंधारात सुरवातीला लोकांच्या लक्षात हा प्रकार आला नाही मात्र काही जागरुक नागरिकांनी पूल बुडाल्याचे समजताच पुलाच्या दोन्ही टोकांना वाहने लावून सर्वाना सतर्क केले.

रात्री उशिरा पाणी आणखी वर चढल्यास पारोडा गाव पुराच्या पाण्यात बुडू शकतो, अशी माहिती पंच दीपक खरंगटे यांनी दिली. या पूर्वी अनेक वेळा पावसाळ्यात पारोडा गाव पुराच्या पाण्यात बुडालेला आहे.

रात्री उशिरा गावात पाणी शिरण्याचा धोका असल्याने गावातील लोक सतर्क झालेले आहेत.दरम्यान पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने खबरदारीचे उपाय म्हणुन या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.

Back to top button