अरविंद केजरीवाल : गोवा ‘फर्स्ट क्लास’, नेते ‘थर्ड क्लास’ | पुढारी

अरविंद केजरीवाल : गोवा ‘फर्स्ट क्लास’, नेते ‘थर्ड क्लास’

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील जनता चांगली आहे; पण येथील राजकारणी भ्रष्ट आहेत. जनता ‘फर्स्ट क्लास’असली तरी नेते मात्र ‘थर्ड क्लास’ आहेत. काँग्रेस असो वा भाजप दोघांनीही गोव्याचा विकास केला नाही. निवडणुकीत अशा भ्रष्ट नेत्यांना उखडून टाकून आम आदमी पक्षाला एक संधी द्या, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले.

पणजी येथील कांपाल मैदानावर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. सत्तेत आल्यास गोव्यातील आम आदमीला ‘खास’ बनविणार, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. व्यासपीठावर माजी आमदार एलिना साल्ढाणा, महादेव नाईक, अ‍ॅड. अमित पालेकर, रामराव वाघ, राहुल म्हांबरे, विश्वजित कृ. राणे, प्रतिमा कुतिन्हो, व्हेंसी व्हिएगस, वाल्मिकी नाईक, सेसिल रॉड्रिग्ज व ‘आप’चे अन्य नेते उपस्थित होते.

केजरीवाल म्हणाले की, गोव्याच्या 60 वर्षांच्या राजकारणात काँग्रेसने 27 वर्षे, भाजपने 15 वर्षे, तर मगोपने 15 वर्षे राज्य केले. मात्र, या तिन्ही पक्षांनी गोव्याचा मूलभूत विकास केला नाही. त्यांनी केवळ आपला विकास केला. गोव्यातील जनता उत्कृष्ट आहे. मात्र, येथील राजकारणी निकृष्ट आहेत. पूर्वी निवडणुकीनंतर आमदार विकले जायचे. आज तर निवडणुकीपूर्वीच उमेदवार स्वतःची बोली लावत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मंत्रिमंडळातील मंत्री विविध घोटाळ्यामध्ये अडकले आहेत. आमदारांवर बलात्काराचा खटला सुरू आहे. कुणी कोव्हिड काळात भ्रष्टाचार केला तर कुणी कचर्‍यात, तर कुणी नोकर्‍यांमध्ये, असे नमूद करून केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील जनतेला असले राजकारणी नको आहेत. त्यांना बदल हवा आहे.

आपल्याला हे भ्रष्ट सरकार, भ्रष्ट व्यवस्था बदलावी लागणार आहे. असल्या नेत्यांना घरी पाठवून आम आदमी पक्षाला संधी द्या. ‘आप’ सत्तेत आल्यास आम्ही भ्रष्टाचारमुक्‍त शासन देऊ. आमचे उमेदवार पक्षांतर करणार नाहीत, अशी हमी आम्ही लिहून देणार आहोत. आम्ही दिलेली कोणतीही हमी पूर्ण केली नाही, तर पुढच्या वेळी आम्हाला घरी बसवा, मी पुन्हा येथे मत मागण्यासाठी येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मला राजकारण येत नाही; मला फक्‍त लोकांची कामे करता येतात. गोव्यातील राजकारण तर मला अजिबात समजत नाही, असे सांगून केजरीवाल म्हणाले की, विमानात बसलो तेव्हा काँग्रेसचे तीन आमदार होते, उतरल्यावर मात्र दोनच शिल्लक राहिले. हे बदलण्याची हीच वेळ आहे. आमच्या पाच हमींवर सतत टीका केली जात आहे. मात्र मला सांगायचे आहे की, गोव्याचा अर्थसंकलप 22 हजार कोटींचा आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन दिल्यास सर्व हमी पूर्ण करण्यासाठी पैसे मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, ‘आप’ नेते अमित पालेकर, राहुल म्हाम्बरे, प्रतिमा कुतिन्हो, एलिना साल्ढाणा , रामराव वाघ ,वाल्मिकी नाईक ,सेसिल रॉड्रिग्ज , विश्वजीत कृ. राणे यांनी आपले मत मांडले.

मंत्र्यांना मोफत; जनतेला का नाही?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जर मंत्र्यांना मोफत घर, पेट्रोल, वीज, गाडी व अन्य सोयी-सुविधा मिळत असतील तर जनतेलाही मिळायला हव्यात. विरोधकांचा मोफतवर राग आहे. कारण त्यामुळे त्यांना पैसे खायला मिळणार नाहीत, हे त्यांना कळून चुकले आहे.

Back to top button