पणजीत महिला सुरक्षेसाठी देशातील पहिली ‘पिंक फोर्स’ सज्ज | पुढारी

पणजीत महिला सुरक्षेसाठी देशातील पहिली 'पिंक फोर्स' सज्ज

पणजी : पुढारी वृत्तसेवा

महिलांच्या सुरक्षेसाठी 24 x 7 सज्ज असणाऱ्या ‘पिंक फोर्स’ चे अनावरण झाले. केवळ महिला सुरक्षेसाठी विशेष पोलीस फोर्स स्थापन करून पुढाकार घेणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील ११ पोलीस ठाण्यात सुसज्ज व्हॅनसह पिंक फोर्स कामासाठी सज्ज झाली आहे. राज्यात आता कुठेही, केव्हाही महिलांना काहीही समस्या आल्यास त्या ‘पिंक फोर्स’ ची मदत घेऊ शकतात.

१०९१, १००, ११२ या हा टोल फ्री क्रमांक वापरून महिला मदतीसाठी संपर्क साधू शकणार आहेत. ७८७५७५६१७७ या क्रमांकावर संपर्क साधून जर सातत्याने कुणाकडून, कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर महिला पुराव्यानिशी तक्रार करू शकणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, मुख्य सचिव परिमल राय, आमदार बाबूश मोन्सेरात, पोलीस महानिरीक्षक आय.डी शुक्ला, पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य, पोलीस अधीक्षक निधी वासन, गायिका हेमा सरदेसाई, अभिनेत्री व उद्योजिका पूजा बेदी, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या संचालिका, राहीला खान, केतकी परब, अमिता सलंत्री आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेवून, हा  महत्वाचा उपक्रम मुख्यमंत्र्यांनी सुरु केला आहे. ज्याचे कौतुक करावे तिथे थोडे आहे, अशा भावना त्‍यांनी व्यक्त केल्या. अभिनेत्री पूजा बेदी यांनी गोव्यात माझ्या दोन कंपन्या आहेत आणि केवळ सुरक्षेच्या मुद्द्यावर माझ्या दोन महिला कर्मचारी नोकरी सोडून गेल्या आहेत. पिंक फोर्समुळे माझ्या महिला कर्मचाऱ्यांची चिंता आता मिटली आहे असे मनोगत व्यक्त केले. आपल्या सुरेल आवाजात गाणे सादर करत हेमा सरदेसाई यांनी फोर्समधील महिलांना आत्मविश्वास दिला.

शहरातील पीपल्स स्कुल, मेरी इमॅक्युलेट गर्ल्स स्कुल या शाळांमधील ९ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर करत फोर्स कशा पद्दतीने काम करेल याची माहिती दिली. दरम्यान, फोर्सची माहिती देणारी एक धवनीचित्रफीतही दाखविण्यात आली. फोर्ससाठी तैनात करण्यात आलेल्या व्हॅनला झेंडा दाखवून त्याचे अनावरण झाले.

पोलीस महानिरीक्षक आय.डी शुक्ला यांनी, या फोर्सचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. ती तुमच्यासाठीच आहे. सर्वकाही खाकी गणवेशात शक्य होत नाही म्हणून हा गुलाबी गणवेश तुमच्यासाठी आहे. मोकळेपणाने मदत मागा, पोलीस तुमच्यासाठीच आहेत असे म्हणत स्वतःला मदत करण्यासाठी पिंक फोर्सला मदत करा, असे आवाहन केले. या वेळी  पथनाट्य व गाण्याच्या माध्यमातूनही  फोर्सची माहिती देण्यात आली.

पिंक फोर्समधील महिलांना सुरक्षेसाठी आवश्यक असे सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. अतिथी देवो भव: ही राज्याची संस्कृती आहे म्हणूनच केवळ राज्यातील महिलांसाठीच नाही तर राज्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ही फोर्स सज्ज आहे.

– मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

हेही वाचा

Back to top button