गोव्यात तृणमूल काँग्रेस-मगो-आपचं ठरलं! | पुढारी

गोव्यात तृणमूल काँग्रेस-मगो-आपचं ठरलं!

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ताधारी भाजपविरोधात राजकीय जाळे विणण्यास पश्चिम बंगालमधून आलेल्या तृणमूल काँग्रेसने सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेल्या भेटीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सोमवारी मगोने आपण तृणमूलसोबत निवडणूकपूर्व युती करत 12 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. या युतीत आम आदमी पक्ष सहभागी होणार आहे. मात्र, ती निवडणूकपूर्व युती असेल की जागा वाटपाबाबतचा समझोता हे नंतर समजणार आहे.

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयालाही भेट दिली आणि तृणमूल काँग्रेसच्या राज्य प्रभारी खासदार महुआ मोईत्रा यांनी जागा वाटप 13 रोजी ममता बॅनर्जी जाहीर करतील, असे सांगितले. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी म्हणाले की, या युतीत आप सहभागी होणार आहे. ते किती जागा लढवतील हे मागाहून समजणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे ठरले होते. या पक्षांचेही तेच ध्येय असल्याने आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता आम्हाला सत्ता स्थापन करण्यापासून भाजप रोखू शकणार नाही. मगोशी युती करतो, असे सांगून भाजपने जनतेशी दिशाभूल करणे सुरू ठेवले होते. 1994 मध्ये मगोशी युती केली तेव्हा भाजपची ताकद किती होती आणि भाजपचे नेते मगोची ताकद काय, असे विचारतात. त्यांना येत्या निवडणुकीत ही ताकद दिसेलच. मगोने मडकई, फोंडा, प्रियोळ, शिरोडा, मांद्रे, पेडणे, सावर्डे, कुडचडे, डिचोली, हळदोणा, दाबोळी व मये या मतदारसंघात उमेदवार निश्चिती
केली आहे.

भाजपने नेत्यांची आयात सुरू केल्याने भाजपमधील मूळ कार्यकर्ते दुखावले आहेत. तेही आपल्या नेत्यांसोबत पर्यायाच्या शोधात आहेत. मगो भाजप युती झाली असती तर या नेत्या कार्यकर्त्यांना मगोची दारे बंद करावी लागली असती. आता मगो हा भाजपचा नैसर्गिक भागीदार पक्ष मानला जात असल्याने भाजपमधील असंतृष्ट नेते आणि कार्यकर्त्यांसाठी मगोचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

रवी नाईक आज भाजपमध्ये प्रवेश करणार

काँग्रेसचे फोंड्यातील आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता फोंडा येथे समर्थकांसह भाजप प्रवेश करणार आहेत. या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला सशक्त भंडारी चेहर्‍याचा गरज होती. रवी नाईक यांच्या पक्ष प्रवेशानंतर तो शोध थांबणार आहे. अखिल गोमंतक भंडारी समाज संघटनेच्या आश्रयदात्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले नाईक समाजाचे बेरजेचे राजकारण भाजपसाठी करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे. काँग्रेसने फोंडा मतदारसंघातून राजेश वेरेकर यांचे नाव उमेदवारीसाठी घेणे सुरू केल्यापासून रवी नाईक हे कधी काँग्रेस सोडतील याची प्रतीक्षा होती. मध्यंतरी मडकई मतदारसंघातून आपण लढणार, असे नाईक यांनी जाहीर करून राजकीय चर्चेला खतपाणी घातले होते.

मडकईत भाजपची मोर्चेबांधणी

मगो-तृणमूल काँग्रेसची युतीची खबर कळताच मडकई मतदारसंघात भाजपने पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला. सोमवारी काँग्रेसचे माजी गटाध्यक्ष विनोद पोकळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पणजीतील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी खासदार विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत त्यांना पक्ष प्रवेश दिला. 20 वर्षांपूर्वी पोकळे यांनी श्रीपाद नाईक यांच्यासाठी मडकईत काम केले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये होते. यावेळी पोकळे यांनी भाजप पुढील 25 वर्षे राज्यात सत्तेवर राहावा यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन केले.

भाजप स्वबळावर लढणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, मगोशी आता युतीबाबत बोलणी होणार नाहीत. भाजपने स्वबळावर 40 जागा लढवण्याची तयारी केली आहे. आम्ही 22 पेक्षा जास्त जागा जिंकणार हे नक्की आहे. पुढील सरकार भाजपचेच असेल. भाजप हा विजयी होणारा पक्ष असल्याने अनेक नेते पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

काही जागांबाबत तडजोड…

दल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्ष निवडणूकपूर्व युतीचा विचार करत नाही. भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी इतर पक्षांशी काही जागांबाबत तडजोड होऊ शकते. अद्याप तसा निर्णय मात्र झालेला नाही.

Back to top button