लोकसभा निवडणूक : दक्षिण गोव्याचा उमेदवार ठरवताना भाजप, काँग्रेसमोर पेच | पुढारी

लोकसभा निवडणूक : दक्षिण गोव्याचा उमेदवार ठरवताना भाजप, काँग्रेसमोर पेच

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. मात्र, भाजप आणि काँग्रेसला उमेदवार ठरवताना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आज भाजपची उमेदवारी पुन्हा जाहीर झाली आहे. दक्षिण गोव्यामध्ये मात्र भाजप समोर पेच निर्माण झाला आहे. माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर या दोन नेत्यातून कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत भाजपात एकमत होताना दिसत नाही. तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही सर्व काही आलबेल नाही. काँग्रेसचा सध्या एकही उमेदवार नक्की झालेले नाही. उत्तर गोव्यातून 3 नावे व दक्षिण गोव्यातून चार नावे चर्चेत आहेत. मात्र उमेदवार कोण हे ठरवताना काँग्रेस समोरही पेच निर्माण झालेला आहे.

उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांच्यासह डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांचे नाव चर्चेत आहे. तर दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या सोबतच प्रदेश सरचिटणीस वेरियतो फर्नांडिस, काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांची नावे चर्चेत आहे. प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष व मणिपूर मेघालय या राज्याचे काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर यांनीही आपणही दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी जर फ्रान्सिस सार्दिन यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. तर आपण त्यांच्यासाठी काम करणार नाही, आपला त्यांना पाठिंबा नसेल. असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे सार्दीन यांना उमेदवारी द्यावी की नाही, या संभ्रमात काँग्रेस असतानाचआता राहुल गांधी यांचे जवळचे असलेले गिरीश चोडणकर यांनीही आपण दक्षिण गोव्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यामुळे दक्षिण गोव्याचे उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी, या संभ्रमात काँग्रेस आहे.

गिरीश चोडणकर यांनी वाढविला पेच

काँग्रेसने दक्षिण गोव्याची उमेदवारी नेहमीच अल्पसंख्यांक नेत्याला दिलेली आहे. अल्पसंख्याक नेते दक्षिण गोव्यातून निवडूनही आले आहेत. असे असताना गिरीश चोडणकर हे दक्षिणेतून उमेदवारी मागत असल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेत्यांसमोर अल्पसंख्याक मतांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गिरीश चोडणकर यांनी 2019 मध्ये उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र, श्रीपाद नाईक यांनी त्यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी त्यांनी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. तेथेही पराभूत व्हावे लागले होते. आता ते दक्षिण गोव्यातून लढल्यास अल्पसंख्यांकांची मते त्यांना मिळतील का, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या समोर आहे.

हेही वाचा 

Back to top button