पणजी : प्रभाकर धुरी : विधवा आईने मुलीच्या लग्नात यजमानपद भूषवले आणि या विवाहाचे पौरोहित्यही सांभाळले ते दोन महिलांनी. जुनाट आणि बुरसट विचारांना फेकून देत क्रांतीकारक व सुधारक पाउल उचलणारा हा विवाह गोव्यात झाला.
वास्को येथे झालेल्या मुलीच्या लग्नाचे यजमानपद खुद्द मुलीच्या विधवा आईने भूषविले, तर या बदलाला स्वीकारण्यास स्थानिक पुरोहितांनी नकार दिल्याने पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या दोन महिला पुरोहितांनी लग्नाचे पौरोहित्य केले. पेशाने पशुवैद्यकीय अधिकारी असलेल्या गौतमी नाईक यांचे लग्न प्रफुल्लचंद्र आणि नेहा डिचोलकर यांचा मुलगा डॉ. प्रथमेश यांच्याशी ठरले. गौतमीचे वडील स्व. पं. योगराज नाईक बोरकर हे प्रसिद्ध सतारवादक होते. कोविड काळात त्यांचे निधन झाले. त्यामुळे नेहाच्या विवाहाचे यजमानपद कुणी भूषवायचे असा प्रश्न उभा राहिला. यावेळी नेहाने माझ्या लग्नाचे यजमानपद माझ्या आईनेच भूषवावे असा तिने आग्रह धरला. तिची आजी (वडिलांची आई) देखील गौतमीची आई उषा नाईक यांच्या पाठीशी उभी राहिली. उषा यांना सासूबरोबरच त्यांची आई शालिनी हळदणकर यांनी आणि बहीण शीतल आरोलकर यांनीही पूर्ण पाठींबा दिला. त्यामुळे गौतमीच्या विवाहाचे यजमानपद तिच्या आईनेच करायचे हे नक्की झाले; पण प्रश्न होता तो नवरा मुलगा डॉ. प्रथमेश यांच्या घरच्यांचा आणि लग्नासाठी पुरोहित मिळवण्याचा. नवरा मुलगा डॉ.प्रथमेश डिचोलकर यांच्या वडिलांचेही नुकतेच निधन झाले आहे. त्याचे काका धनू डिचोलकर हे नाट्यकर्मी व पुरोगामी विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांनीही या गोष्टीला पाठिंबाच दिला.
स्थानिक पुरोहितांनी वेगवेगळी कारणे सांगून असे करता येणार नाही आणि आपली त्याला संमती नाही, असे म्हणत पौरोहित्य करण्यास नकार दिला. उषा नाईक यांनी आपल्या भावाचा मित्र हरी शर्मा यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या शमा पुणेकर आणि वंदना पाटील या दोघा महिला पुरोहितांना यासाठी विनंती केली व या दोघींनीही ती मान्य केली आणि त्यानंतर हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
माझ्या बाबांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला. माझ्या लग्नाबाबत आईची खूप स्वप्ने होती. मला कायम आनंदी बघण्यासाठी तिने अपार कष्ट सोसले. त्यामुळे यजमान पदाचाअधिकार मला आईलाच द्यायचा होता.
-गौतमी नाईक, नववधूरूढी,परंपरा काळानुसार बदलायलाच हव्यात. त्याची सुरुवात गौतमीच्या आईने केली. येणार्या काळात हा नवा बदल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
-धनू डिचोलकर, वराचे काका