गोवा : कळंगुट येथील हॉटेलचे ९ लाखांचे बील थकविले, चौघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

गोवा : कळंगुट येथील हॉटेलचे ९ लाखांचे बील थकविले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पणजी : पुढारी वृत्तसेवा : कळंगूटमध्ये एका हॉटेलमध्ये पाच दिवस राहून खाऊन-पिऊन मजा केली. शेवटी ९ लाख २१ हजार ४४५ रुपयांचे बील थकवून पर्यटकांनी फसवणूक केली. याप्रकरणी कळंगूट पोलीस स्थानकात खोल्या बुक करणाऱ्या चौघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश येथील तरुण अगरवाल, एकेजी टॅव्हल्स एजन्सीचा प्रतिनिधी ए. के. गुप्ता, रायपूर येथील मनीश कासना आणि म्हैसूर (कर्नाटक) येथील रवितेज ऊर्फ प्रशांत कुमार यांच्या विरोधात कळंगूट येथील नीलम हॉटेलच्या व्यवस्थापकाने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. व्यवस्थापक जेकब जॉन यांनी ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

वरील चौघांनी ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत १२० जणांसाठी हॉटेलच्या ४५ खोल्या बुक केल्या होता. ठरल्याप्रमाणे १२० जण हॉटेलमध्ये येऊन राहिले. मौजमजा केल्यानंतर ते परतले. या कालावधीत त्यांना हॉटेलने पुरवलेल्या सेवेचे मिळून एकूण १६ लाख ९ हजार ४४५ रुपये बील झाले. यातील केवळ ६ लाख ८८ हजार रुपये त्यांनी दिले. मात्र, ९ लाख २१ हजार ४४५ रुपये दिलेच नाही. त्यांनी हॉटेलची फसवणूक केली आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा 

Back to top button