भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी | पुढारी

भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी

पणजी, पुढारी वृत्तसेवा : भाजपने लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे दक्षिण गोव्यामध्ये प्रचारात व्यग्र आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम हे गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत भाजपच्या विविध मोर्चाच्या प्रमुखांची बैठक घेतली व मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपसभापती ज्योसुआ डिसोझा, ओबीसी मोर्चा प्रमुख जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कैकर, महिला मोर्चाच्या प्रमुख आरती बांदोडकर, युवा मोर्चाचे प्रमुख समीर मांद्रेकर व इतर मोर्चाचे प्रमुख उपस्थित होते.

भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भाजपच्या विविध मोर्चांचे मोठे योगदान ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा आणि तळागाळांतील लोकांत जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना त्यांना सांगा, असे आवाहन गौतम यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेले भरीव काम लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

भाजपने देशाला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिलेले आहे. त्याची जाणीव सर्व मतदारांना करून देण्याची जबाबदारी प्रत्येक मोर्चाच्या सदस्यावर आहे. आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने जास्तीतजास्त मते भाजपच्या उमेदवाराला कशी मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, असेही गौतम यांनी सांगितले.

कामाचे सातत्य ठेवा : तानावडे

सदानंद तानावडे यांनी विविध मोर्चानी विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले आहे. त्यांना तेच सातत्य लोकसभेमध्ये ठेवावे लागेल. विधानसभेमध्ये भाजपला गोव्यात बहुमत मिळाले. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत त्या मिळवण्यासाठी जास्त परिश्रम करण्याची गरज असून त्यासाठी विविध मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संलग्न राहून भरीव काम करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या आहेत की नाही हे पाहून त्या योजनांचा लाभ लोकांना देण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे तानावडे म्हणाले.

Back to top button