मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सांगेतील कोमुनिदाद जमिनीत बेकायदा चिरे काढण्याच्या प्रकरणात चिरेखाण माफियांना खाण आणि भूगर्भ खात्याने दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रकार ताजा असताना खाण सचिवांनी सांगे पालिकेचे नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस यांना बेकायदा चिरेखाण प्रकरणात 1 कोटी 31 लाख 25000 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. आदेशाची प्रत मिळण्याच्या सात दिवसांच्या आत ती रक्कम न भरल्यास सक्तीने वसुली करण्यात येईल, असा इशारा खाण सचिव अजित रॉय यांनी दिला आहे.
बेकायदा चिरेखाण प्रकरणाची ही घटना सांगेच्या मुगोळी गावात सर्व्हे क्र.42/0 या जमिनीत घडली आहे. समाजसेवक जेरविस फर्नांडिस यांनी खाण आणि भूगर्भ संचालनालयाकडे या संदर्भात तक्रार केली होती. ही तक्रार खाण संचालनालयाने सांगेच्या मामलेदारांकडे वर्ग केली असता मामलेदार आणि खाण खात्याच्या अधिकार्यांनी 28 सप्टेंबर 2022 रोजी संयुक्तरीत्या मुगोळी येथील 42/0 सर्व्हे क्रमांकातील त्या चिरेखाणीची पाहणी केली.चौकशी दरम्यान, त्या खाणीला लीज किंवा परवानगी देण्यात आली नव्हती. असे प्राथमिक तपासात समोर आले. चौकशी दरम्यान 1500 चौरस मीटरच्या जागेत सहा मीटर खोल उत्खनन करून नऊ हजार चिरे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पीडब्ल्यूडीच्या गोवा शेड्युल रेट ऑफ ब्युल्डिंग 2019 कायद्यान्वये चिर्यांची किंमत 1,31,25000 रुपये एवढी ठरवण्यात आली.
सांगेच्या मामलेदारांकडून करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान, मुगोळी येथील 42/0 सर्व्हे क्रमांकाची जमीन रुमाल्डो फर्नांडिस यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. मात्र, 43/0 सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीवर त्यांचा अधिकार आढळला नाही. रुमाल्डो यांनी सांगेच्या मामलेदारांना पत्र लिहून ही जमीन त्यांच्या आईने ती हयात असताना फातोर्डा येथील नुनो वाझ या व्यक्तीला लीजवर दिली होती आणि वाझ यांनी खाण संचालनालयाकडून त्या जमिनीत चिरे उत्खनन करण्यासाठी 2006 पर्यंत परवानगी मिळवली होती.
दरम्यान, खाण आणि भूगर्भ संचालनालयाने 21 नोव्हेंबर 2022 रोजी रुमाल्डो आणि नुनो वाझ यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून या जमिनीतून बेकायदा चिरे उत्खनन केल्याप्रकरणी 1,32,25000 रुपये दंड का वसूल केला जाऊ नये, याची विचारणा केली. पण वाझ यांचे निधन झाले असल्याने पोस्ट रजिस्टर एडी करण्यात आलेली ती नोटीस त्यांना जारी होऊ शकली नाही.
सुनावणी दरम्यान, रुमाल्डो यांनी वाझ यांनी उत्खनन प्रकिया फार पूर्वी बंद केल्याची आणि आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाझ यांना एकुलता एक मुलगा असून तो विदेशात कामाला असल्याचा अहवाल फातोर्डाच्या तलाठ्याकडून प्राप्त झाला. तिन्ही खाणींतून काढण्यात आलेल्या एकूण चिर्यांची किंमत 1,65,40398 रुपये एवढी ठरवण्यात आली. पण खाण आणि भूगर्भ संचालकांच्या त्या आदेशाला रुमाल्डो यांनी माईन सेक्रेटरी रिव्हीजन ऑथोरीटी यांच्यासमोर आव्हान देत आपले त्या प्रकरणाशी काहीच देणेघेणे नसल्याचा दावा केला. त्यानुसार पुन्हा सुनावणी घेऊन पुरावे आणि अहवालांची फेरतपासणी करण्यात आली. अखेर पूर्वीचा आदेश गृहीत धरून 1,31,2500 रुपये सदर आदेशाची प्रत मिळण्याच्या सात दिवसांच्या आत भरण्याचे आदेश खाण सचिव अजित रॉय यांनी दिले आहेत. तक्रारदार जेरविस फर्नांडिस यांनी खाण सचिवांच्या आदेशाचे स्वागत केले असून आपल्या स्वार्थासाठी पर्यावरण नष्ट करू पाहणार्याना हा धडा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बेकायदा चिरेखाण प्रकरणातील तक्रारदार जेरविस फर्नांडिस यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेऊन राज्याच्या मुख्य सचिवांना त्याबद्दल सूचित केले होते. त्यानुसार तज्ज्ञांची समिती नेमून पुन्हा या खाणीची पाहणी करण्यात आली. यात खाण आणि भूगर्भ खात्याचे सहायक भूगर्भ शास्त्रज्ञ नितीन आतोस्कर, सँडफॉर्ड मास्कारेन्हास, पोलिस उपनिरीक्षक स्वदेश देसाई व इतरांचा समावेश होता.या पाहणीत पूर्वीच्या खाणी शेजारी आणखी दोन जुने उत्खनन आढळले. त्या अहवालाच्या आधारावर सांगे पोलिसांना दोषींवर गुन्हा नोंद करून चौकशी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.